कोल्हापूर : अलमट्टी धरणाच्या उंची वाढीने शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसणार असल्याने सोमवारी आंदोलन अंकुश संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन शिरोळ तालुक्यातील महापूर नियंत्रणाबाबत आठ दिवसांत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
गेली २० वर्षे शिरोळ तालुक्याला महापुराचा त्रास सुरू आहे. २०१९ पासून तीन वेळा महापूर आल्याने नागरिक, शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची वाढवणार असल्याने महापुराचा धोका वाढण्याची भीती शिरोळ तालुक्यातून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. आंदोलनामध्ये अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, नागेश काळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून जिल्ह्यात ३२०० कोटींची महापूर नियंत्रणाची कामे होणार असून, त्यामध्ये शिरोळ तालुक्यात याअंतर्गत कोणती कामे केली जाणार आहेत, अशी विचारणाही या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली.