संभाव्य मंत्रिमंडळात शिवाजीराव नाईक यांचा समावेश करण्यास भाजपाचे नेतृत्व राजी असले तरी पडद्यामागील मित्रांचाच अडसर असल्याने नाइकांचा मंत्रिमंडळातील समावेशास अद्याप हिरवा कंदील मिळेनासा झाला आहे. मात्र आमदार झाल्यानंतर पालकमंत्री म्हणून मिरवणूक काढणारे मिरजेचे सुरेश खाडे यांची राज्य मंत्रिपदावर वर्णी लावून खाडे विरोधाची धार बोथट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या एक वर्षांपासून मंत्रिपदाचे लागलेले डोहाळे पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच निष्ठावंत की काल आलेला हा वाद भाजपात सुरू झाला आहे. स्वाभिमानीला सत्तेत वाटा देत असताना सांगलीचा सत्तेचा अनुशेष भरून काढण्याची तयारी भाजपाने केली आहे. बिहारमधील पक्षाच्या अपयशानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही तर हिवाळी अधिवेशनात अडचणी उद्भवू शकतात हे ओळखून लांबलेला विस्तार येत्या दहा दिवसांत केला जाणार आहे. तशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
दिवाळीचे फटाके संपण्यापूर्वीच सांगलीला लाल दिवा मिळणार असल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेली १५ वष्रे विधानसभेत भाजपाचे प्रतिनिधित्व करणारे सुरेश खाडे पहिल्या रांगेत असले तरी त्यांच्या मंत्रिपदाला भाजपातील निष्ठावंत गटाने खो घालण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. यामुळेच त्यांचे मंत्रिपद दूर राहिले. खाडे यांचा पक्षविस्ताराला फारसा उपयोग नाही असे सांगून त्यांना आतापर्यंत विरोध झाला. मात्र विलासराव जगताप अथवा सुधीर गाडगीळ यांच्याबाबत फारसी चर्चा राजकीय वर्तुळात झाली नाही.
नाईक व खाडे यांच्या नावाची भाजपाने सत्ता स्वीकारल्यापासून चर्चा होत आहे. नाईक यांना राज्य कारभाराचा असलेला अनुभव पाहता त्यांच्या नावाची चर्चा होणे अपरिहार्य असले, तरी त्यांच्या कार्यक्षेत्रातूनच भाजपाला पडद्यामागून सहकार्य करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला अडचणी निर्माण होऊ शकतात यामुळे त्यांच्या नावावर फुली पडण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी मूळ आहे ते नागपुरातील गडकरी-फडणवीस यांच्यातील अंतर्गत सत्ता संघर्षांत लपलेले असल्याचे निष्ठावंत सांगतात. नाईक यांचा भाजपा प्रवेश हा गडकरी यांच्या शब्दावर झालेला असल्याने त्यांना डावलून खाडे यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे.
खाडे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाला जिल्ह्यातील निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचा असलेला विरोध कमी करण्यासाठी राज्यमंत्री पदावर बोळवण आणि दुग्धविकास सारखे कमी महत्त्वाचे खाते देण्यावर चर्चा सुरू असल्याचे भाजपा गोटातून सांगण्यात आले. मात्र खाडे यांची सार्वजनिक बांधकाम खात्याची मागणी आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे जिल्ह्याच्या वाटय़ाला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असली तरी कमी महत्त्वाची खातीच वाटणीला येण्याची शक्यता आहे. नाराज निष्ठावंतांना महामंडळात वर्णी लावून नाराजी कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे.
खोत यांना मंत्रिपद दिले तर ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांच्या निवडीची जबाबदारी भाजपावर येणार आहे. सत्ताधारी कोटय़ातूनच त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे लागणार आहे. मात्र या जागांसाठी पक्षाचे निष्ठावंत कार्यकत्रे आग्रही असल्याने त्यांची समजूत कशी काढली जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षाला एक खासदार, चार आमदार देणाऱ्या जिल्ह्यातील संघनिष्ठ भाजपा कार्यकत्रे यामुळे अस्वस्थ आहेत. ना त्यांना आनंद व्यक्त करता येणार ना नाराजी व्यक्त करता येणार अशी द्विधा मनस्थिती निष्ठावंत गटाची झाली आहे.