सांगली : मिरजेतील भारतनगर येथील ख्रिश्चन दफनभूमीजवळ काळ्या रंगाच्या कारमध्ये पिस्तुलांसह बसलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. दर्शन अनिल कांबळे (वय २६, रा. ईदगाहनगर झोपडपट्टी, मिरज) आणि शेखर महावीर लोंढे (वय २९, रा. माजी सैनिक वसाहत, सह्याद्रीनगर, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे आणि आठ लाख रुपये किमतीची हुंडाई व्हेन्यू कार असा सुमारे नऊ लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, हवालदार अमोल ऐदळे व रोहन घस्ते यांना भारतनगर येथील ख्रिश्चन दफनभूमीजवळ काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनात दोन जण पिस्तुलांसह बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संशयित वाहन आढळून आले. पंचांसमक्ष कारवाई करून वाहनातील दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता दर्शन कांबळे याच्या पॅन्टच्या मागील बाजूस, तर शेखर लोंढे याच्या पॅन्टच्या उजव्या बाजूस एक-एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळले. दोन्ही पिस्तुलांच्या मॅगझिनमध्ये प्रत्येकी एक जिवंत काडतूस मिळून आले.

पिस्तुलांसाठी परवाना आहे का, अशी विचारणा केली असता दोघांकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आले. चौकशीत दर्शन कांबळे याने पिस्तूल शेखर लोंढे याच्याकडून घेतल्याचे सांगितले. तर शेखर लोंढे याने दोन्ही पिस्तुले कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील कोपळ येथील आकाश ढिगे याच्याकडून खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले.