सांगली : गुन्हेगार टोळीतील पूर्ववैमनस्यातून एका तरूणावर भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सहा जणांनी धारदार हत्याराने हल्ला करण्याची घटना  मंगळवारी मिरजेत घडली. गंभीर जखमी तरूणाला पोलीसांनी शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शिवकुमार अथणी असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून तो मिरज ते  टाकळी रस्त्यावर जात असताना अज्ञात सहा जणांच्या हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार हत्याराने वार केले. यात तो गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण चौगले व उप अधिक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरूणास तात्काळ रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, हा हल्ला टोळीतील वर्चस्व वादातून झाला की पूर्ववैमनस्यातून करण्यात आला याची चौकशी सुरू आहे. जखमी तरूण बेशुध्द असून त्याचा जबाब घेतल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. पोलीसांचे पथक हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आल्याचे पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर हल्ला झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. सांगली व मिरज शहरात किरकोळ कारणावरून हाणामारीचे प्रकार घडत असून पोलीस यंत्रणा असे प्रकार रोखण्यासाठी असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे.

पोलीस दप्तरी गुन्हेगार म्हणून नोंद असलेल्या संशयिताकडून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हल्ले होत असल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी खून प्रकरणी पोलीसांच्या ताब्यात असणाऱ्या संशयित आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न विरोधी गटाकडून झाला. मात्र पोलिसांच्या दक्षतेने हा प्रकार रोखला. गेल्या आठवड्यात पोलीसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करत सात देशी बनावटीची पिस्तुले जप्त केली. मात्र पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली जात असल्याचे तपासात स्पष्ट होऊनही मुख्य सूत्रधार अद्याप हाती लागला नाही. अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील सहभाग हाही चिंतेचा विषय ठरला आहे.