सांगली : नंदकिशोरा चित्त चकोरा, कान्हा पडते मी पाया, वाजवितो बासरी तो कृष्णमुरारी यासारख्या गवळणीपासून दिलवरा नटले तुम्हासाठी, ढोलकीच्या तालावर यासारख्या  अजरामर मराठी गीतावर मानसी नाईक या नृत्यांगणेच्या पदलालित्यांनी मिरजेतील दहीहंडीवेळी तरूणाईही बेधुंद नाचली. निमित्त होते देवाभाउ चषक दहीहंडी उत्सवाचे.

जनसुराज्य शक्ती पक्ष व महयुतीच्यावतीने जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी देवाभाउ दहीहंडी उत्सवाचे आयोजन मिरजेतील रूद्र पशुपती मैदानावर आयोजन करण्यात आले होते. यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. डीजेला फाटा देत यावेळी सिने अभिनेता चंकी पांडे, गायक संजय राठोड, नृत्यांगणा मानसी नाईक, नेहा खान यांच्या गीतांचा व नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेक जुन्या लावण्या, गवळणी यावर नृत्य करत मानसीने प्रेक्षकांनाही नृत्याचा ठेका धरायला लावले.

दहीहंडीचे पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार अशोक माने, आ. सत्यजित देशमुख, आ. सुधीर गाडगीळ आ. इद्रिस नायकवाडी आदी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. डॉ. विनय कोरे आदींनी दृकश्राव्य  माध्यमातून शुभेच्छा देत सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यक्रमासाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम, विश्‍वगंधा कदम, समरदित्य कदम आदींनी आवर्जुन हजेरी लावली.

देवाभाउ चषकाचा आणि रोख एक  लाख ११ हजार रूपयांच्या बक्षिसाचा मान तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने आठ थराचा मनोरा उभा करत मिळवला. यावेळी फटाक्याची जोरदार आताषबाजी करण्यात आली.