सांगली : प्रशासकीय मान्यता नसताना मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला गुरूवारी सकाळी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा नामफलक लावला. यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून पंचायत समिती आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजासाठी पाच कोटी रूपये खर्च करून नवीन इमारत उभारण्यात आली आहे.या इमारतीचे लोकार्पण सोहळ्यावरून सत्ताधारी व विरोधक असा संघर्ष निर्माण झाला होता. अधिकृत लोकार्पण होण्यापुर्वीच खासदार विशाल पाटील, आ . जयंत पाटील, अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. तर आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नूतन इमारतीमधील सभागृहाचे छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे नामकरणही करण्यात आले.
दरम्यान, गुरूवारी सकाळी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी अचानक पंचायत समितीच्या इमारतीला डॉ. आंबेडकर यांचे नाव असलेला फलक लावला. बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, अरविंद कुरणे, उमेश भाऊ धेंडे, सागर आवळे, विकास कांबळे, परशुराम बनसोडे, जयंत मगरे, प्रवीण सर्वदे आणि धनराज कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या घटनेची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता या घटनेनंतर पंचायत समिती प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, याबाबत पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
