सांगली : विकास आघाडीच्या अनुपस्थितीमुळे मिरज पंचायत समितीची सत्ता पुन्हा महायुतीच्या ताब्यात आली असून सभापतीपदी भाजपच्या राणी भोरे तर उपसभापती पदी शिवसेना शिंदे गटाच्या ललिता शेजुळे यांची अविरोध निवड झाली. राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेउन पंचायत समिती आवारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर दि. १० मार्च रोजी झालेली सभापती, उपसभापती निवड शिवसेना शिंदे गटाच्या एका सदस्यांच्या गैरहजेरीमुळे महाविकास आघाडीने जिंकली होती. या पदाधिकारी निवडीबाबत श्रीमती भोरे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत एका सदस्याचे अपहरण झाल्याने झालेली पदाधिकारी निवड रद्द करत विभागीय आयुक्तांनी फेरनिवडीचे आदेश दिेले होते. या आदेशावर करण्यात आलेले अपिलही फेटाळण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी निवड करण्यात आली. सभापती पदासाठी श्रीमती भोरे व उपसभापती पदासाठी श्रीमती शेजूळ यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड अविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले. निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्याची आताषबाजी केली. नूतन पदाधिकार्यांचे आमदार सुरेश खाडे, माजी खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील आदींनी अभिनंदन केले.
दरम्यान, पदाधिकारी निवडीवेळी मोठा राजकीय संघर्ष होईल अशी शययता गृहित धरून पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उप अधिक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक किरण चौगले, सोमनाथ वाघ, सहायक निरीक्षक संदीप शिंदे आदीसह मिरज शहर, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जिल्हा मुख्यालयातील राखीव पोलीस तैनात करण्यात आले होते. पंचायत समितीसमोरील रस्त्यावरील वाहतूकही जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. पंचायत समितीच्या प्रवेशदारावर पोलीस तैनात करण्यात आले होते. ओळखपत्र पाहूनच सदस्य, पंचायत समितीचे कर्मचारी व माध्यम प्रतिनिधी यांना आत सोडण्यात येत होते.
