सांगली : विनापरवाना लावण्यात आलेले फलक प्रशासनाने काढल्याच्या निषेधार्थ आज आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.
मिरज पंचायत समिती सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज सभागृह आणि प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करणारे फलक लावण्यात आले होते. नामकरणासाठी मिरज पंचायत समितीच्या सभेत कोणताही ठराव अथवा सूचना नसताना हे फलक लावण्यात आल्याने प्रशासनाने हे फलक दोन दिवसापुर्वी हटविले.
प्रशासनाच्या या कृतीचे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे.याचा एक भाग म्हणून आज पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला काँग्रेसचे सुभाष खोत, शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
प्रशासकीय इमारतीला डॉ. आंबेडकर यांचे नाव आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देेण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्य प्रवेशदार बंद ठेवण्यात आले होते.
दरम्यान, मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवड उद्या मंगळवारी होत असून यावेळी सत्ता पालट करण्याचे कसोशीचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. या निवडीला स्थगिती मिळते की, निवडी होतात याकडे कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पंचायत समिती निवडणुकीनंतर झालेल्या पदाधिकारी निवडीवेळी एक सदस्य अनुपस्थित राहिल्याचा फायदा घेत महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून रोखले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांन सोबत घेत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची सभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या ललिता शेजूळ यांची उपसभापती म्हणून निवड झाली होती. मात्र, राणी भोरे यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी ही निवड रद्द केली. फेरनिवड करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार मंगळवारी सभापती व उपसभापती निवडीसाठी सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
दरम्यान, निवड रद्द झालेले पदाधिकारी यांनी ग्रामविकास मंत्रीी यांच्याकडे अपिल केले आहे. या अपिलावर आज सुनावणी असून न्यायालयातही धाव घेतली आहे. यामुळे सभापती, उपसभापती निवड होणार की नाही याबाबत सायंकाळपर्यंत साशंकता होती. सभापती भाजपचाच करायचा यासाठी प्रयत्न सुरू असून विरोधी गटातील दोन सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रांताधिकार्यांनी पंचायत समिती आवारात उद्या एक दिवस जमावबंदी लागू केली असून हा पंचायत समितीसमोरील रस्त्यावरून होणार्या वाहतुकीला उद्या एक दिवस मनाई आदेश पोलीस अधिक्षकांनी जारी केला आहे.
