सांगली : मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीवरून महाविकास आघाडीत व भाजप यांच्यात निर्माण झालेल्या वादाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी सभापती तन्वी कमलेकर यांना अपात्र ठरविल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे मिरज पंचायत समितीसह सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता. सदस्य इंगळे यांच्या कथित अपहरणाच्या प्रकरणामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती. तसेच सभापतीची निवड अनधिकृतरीत्या झाल्याचा आरोप करत भाजपच्या कवलापूर गटाच्या पंचायत समिती सदस्या राणीताई भोरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून तो अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी विविध कारणांचा आधार घेत तन्वी कमलेकर यांना सभापतीपदासाठी अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला आहे.सत्ताधारी गटाला वगळून भाजपने प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला असा आरोप करत आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत कु. कमलेकर यांनी उद्घाटन उरकले होते. तथापि, आ. सुरेश खाडे यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अधिकृत लोकार्पण सोहळा घेतला होता.

यावेळी मंत्री गोरे यांनी “लवकरच पुढील सभापती भाजपचा असेल,” असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर झालेल्या या निर्णयामुळे त्या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.या निर्णयामुळे मिरज पंचायत समितीतील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या निर्णयाचे पडसाद जिल्हा परिषद आणि सांगली-मिरज विधानसभा मतदारसंघांच्या राजकारणावरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.