कोल्हापूर : अनेक अडचणी याआधी माझ्या आयुष्यात आल्या आहेत. कोणी पक्ष सोडून गेल्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही. ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या ते लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे सामान्य जनता आमच्या सोबत येत आहे, असे मत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूूक तोंडावर असताना काँग्रेसच्या अनेक खंद्या शिलेदारांनी आमदार पाटील यांची साथ सोडली आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी भूमिका व्यक्त करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला.राज्यात सत्ता आली, की कर्जमाफी करू, असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले होते. शेतकरी आत्महत्यांबाबत शासनाने समिती तयार केली आहे. मात्र, त्याला कार्यकाळ द्यायला हवा. केवळ जिल्हा परिषद निवडणूक आहे म्हणून देखाव्यासाठी समिती स्थापन होता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रभागरचना करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला होता. दोन वर्षांपूर्वी कायदा बदलण्यात आला. आता, हे सर्व अधिकार नगरविकास विभागाने घेतले आहेत, यावरच आक्षेप आहे. राज्यात प्रभाग रचना करताना कोणत्याही दबावाने ती करता कामा नये, राज्यातील प्रत्येक प्रभाग रचनेवर आमचे बारीक लक्ष असेल. अधिकाऱ्यांनी चुकीचे आणि दबावाखाली काहीही करू नये, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.