कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला भरीव निधी मिळाल्याबद्द भाजप कार्यकर्त्यांनी देवीचे दर्शन घेऊन भाविकांना साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला, असेही भाजपने म्हटले आहे.
विकास आराखड्याच्या अंमलबजावणीनंतर मंदिर परिसराचे रूपडे पालटणार असून काशी विश्वनाथ आणि उज्जैन येथील महाकाल मंदिर कॉरिडॉरच्या धर्तीवर महालक्ष्मी मंदिराचा विकास होईल. भूसंपादनासह इतर सर्व कामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होईल. राखडा पूर्णत्वाला गेल्यानंतर कोल्हापूरच्या समृद्धीमध्ये आणि पर्यटनामध्ये वाढ होईल, असा विश्वास आमदार महाडिक यांनी व्यक्त केला. भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव यांनी आराखडा लवकरच पूर्णत्वाला जाईल आणि दक्षिण काशी कोल्हापूरची ओळख अधिक ठळक होईल, असा विश्वास व्यक्त केला.