कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीने यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना रविवारी ( ४ ऑक्टोबर ) प्रदान करण्यात करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये , सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दुपारी ३.३० वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, गायन समाज देवल क्लब येथे होणाऱ्या या कार्यक्रमावेळी मोहन जोशी- ज्योती मोहन जोशी या उभयतांची मुलाखत राजेश दामले घेणार आहेत.

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये अनेक दशके आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे मोहन जोशी हे मराठी मनोरंजनविश्वातील एक महत्त्वाचे नाव आहे. रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत विविध भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.

यापूर्वी हा मानाचा पुरस्कार शरद भुताडिया, अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार असल्याने नाट्यरसिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत. सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार श्री. राजेश दामले ही मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून मोहन जोशी यांच्या कलाप्रवासातील विविध टप्पे, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अनुभव, संस्मरणीय भूमिका, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी तसेच त्यांच्या यशस्वी वाटचालीत सौ. ज्योती जोशी यांची लाभलेली साथ अशा विविध पैलूंवर मनमोकळा संवाद रंगणार आहे.