सांगली : तलावात पडलेल्या मुलीला वाचवण्यास पाण्यात उतरलेल्या आईसह मुलींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मणेराजुरी (ता. तासगाव) येथे घडली.  मृत महिला मूळची सातारा जिल्ह्यातील असून ती कुटुंबासह मजुरीसाठी मणेराजुरी येथे आली होती.

याबाबत माहिती अशी, सत्वला संतोष जाधव (वय २८) ही महिला आपल्या दोन मुलीसह धुणे धुण्यासाठी मणेराजुरी- वज्रचौंडे रस्त्यावर असलेल्या चिमणखोरा पाझर तलावाच्या ठिकाणी गेली होती. आई व थोरली मुलगी तलावाच्या काठावर धुणे धूत असताना आठ वर्षाची मुलगी मंजू संतोष जाधव ही पाण्यात पडली. ती पाण्यात पडल्याचे पाहताच आईनेही तिला  वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, तिला पोहता येत नव्हते. तसेच तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघीही बुडाल्या. थोरल्या मुलींने आई व बहिण पाण्यात बुडाल्याचे पाहून आरडाओरडा केल्यानंतर ही बाब लक्षात आली. यानंतर गावकर्‍यांनी दोघींना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत मायलेकीचा पाण्यात बूडून मृत्यू झाला होता.

 तासगाव पोलीस ठाण्यास माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.