scorecardresearch

पोटनिवडणुकीसाठी मविआच्या हालचाली; मुख्यमंत्र्यांचा सहभाग

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी महाविकास आघाडी अंतर्गत करवीरनगरी आणि राजधानी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत व्यूहरचनेच्या हालचाली गतिमान झाल्या.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार संजय मंडलिक यांनी मार्गदर्शन केले. सोबत सतेज पाटील, विजय देवणे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी महाविकास आघाडी अंतर्गत करवीरनगरी आणि राजधानी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत व्यूहरचनेच्या हालचाली गतिमान झाल्या. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे झालेल्या पहिल्या बैठकीवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. शिवसेनेकडून असलेल्या अपेक्षा, पोटनिवडणूक तयारी व रणनीती बाबत चर्चा झाली. दुसऱ्या बैठकीवेळी खासदार विनायक राऊत, कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार उपस्थित होते. कोल्हापूर पोटनिवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढली जात आहे. काँग्रेसची उमेदवारी आपलीच आहे असे समजून प्रचारात सक्रिय राहून शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जयश्री जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

शिवसेनेचा मेळावा

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रचाराच्या नियोजनासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आज येथे मेळावा पार पडला. खासदार संजय मंडलिक यांनी राज्यात भाजपचे झुंडशाहीचे सुरू असलेले राजकारण मोडून काढण्याचे काम या पोटनिवडणुकीत शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन केले. जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, मातोश्रीच्या आदेशाचा सन्मान करून शिवसैनिक विजयश्री खेचून आणतील. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिक भाजपच्या पराभवासाठी आपली वज्रमूठ एकवटतील, असा विश्वास व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर राजेश क्षीरसागर यांची नाराजी दूर होईल. ही निवडणूक महा विकास आघाडीचे सत्य आणि भाजपचे खोटं अशा संघर्षांची असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Movements by elections chief ministers participation meeting shiv sena ysh