दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा घेतल्यानंतर त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून आजी-माजी आमदारांनी  समर्थन दिल्याने शिवसेनेला हादरा बसला. ताज्या राजकीय हालचाली पाहता जिल्ह्यातील संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन्ही खासदारही शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. मंडलिक गटाने मेळावा घेऊन याबाबतची भूमिका जाहीर केली असून तिची घोषणा मंडलिक यांनी करणे इतकीच औपचारिकता उरली आहे. माने हेसुद्धा हाच कित्ता गिरवण्याच्या तयारीत असल्याने सेनेला दुसऱ्या जबर धक्क्याला सामोरे जावे लागत आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापुरातील माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.

मंडलिक गटाचा मेळावा होऊन विकासकामे होण्यासाठी शिंदे यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला. अर्थात, कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला आणि त्यांच्या भावनांना प्रतिसाद म्हणून आपण शिंदे गटाबरोबर जात आहोत, अशी नेपथ्य रचना आधीच ठरवली गेली असल्याचे एकंदरीत मेळाव्याचे राजकीय नाटय़ पाहता दिसत आहे. खासदार माने हेही दोन दिवस संपर्कात नाहीत. राष्ट्रपती निवडणूक, संसदेचे पावसाळी अधिवेशन अशा गरमागरम राजकीय हालचाली असताना त्यांचे नॉट रिचेबल होणे बरेच काही दर्शवणारे आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी त्यांनी केल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ त्याला प्रतिसाद दिला. माने हे ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असते तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद नोंदवला नसता असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. खेरीज हा निर्णय झाल्यानंतर माने समर्थकांनी शिंदे यांचा लगेचच सत्कारही केला. या साऱ्या घडामोडी पाहता नजीकच्या काळात मंडलिक व माने हे दोन्ही खासदार शिंदे गटात डेरेदाखल होतील हे एव्हाना स्पष्ट झाले आहे.

धक्क्याचा केंद्रबिंदू वारणा

ठाकरे यांच्याशी निष्ठा वाहिल्यानंतर शिंदे यांच्यासोबत जाण्याची भूमिका कशी घेतली जावी यासाठी दोन्ही खासदारांची चर्चेची खलबते पार पडली आहेत. त्याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्याचा परिसर राहिला असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. पन्हाळय़ाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, आमदार विनय कोरे यांच्याशी आदल्या रात्री खासदार माने यांनी भेट घेतली.

महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला हे खरे असले तरी सत्तेचा फायदा शिवसेनेपेक्षा मित्रपक्षांना झाला. उद्धव ठाकरे हे भावाप्रमाणे आहेत. विस्कटलेले कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीत असताना काही खासदारांनी मला शिंदे गटाच्या बाजूने येण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जावे असा निरोप दिला आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने खासदारांशी साधकबाधक चर्चा करून मी निर्णय घेणार आहे.

 – संजय मंडलिक , खासदार