कराड : अधिक मासाचे औचित्य साधून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कराड आगाराने भाविकांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. यंदाची भक्तीयात्रा अधिक सुकर, सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी प्रशासनाने थेट गावागावातून वातानुकूलित (एसी) बसेस सोडण्याचे विशेष नियोजन केले आहे.

​‘सुरक्षित प्रवास, उत्तम सेवा’ हे ब्रीद जपत कराड आगाराच्या व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष भक्ती सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, अष्टविनायक, ११ मारुती आणि साडेतीन शक्तीपीठांसह प्रमुख धार्मिक व पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

​ग्रामीण भागातील भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी, कोणत्याही गावातून किमान ४३ प्रवाशांचे आगाऊ आरक्षण (बुकिंग) झाल्यास थेट त्याच गावातून बस सुटण्याची आणि सहलीअंती तिथेच परतण्याची नामी सोय करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नियमानुसार तिकिटात सवलत लागू राहील. हा विशेष उपक्रम १५ जूनपर्यंत राबवण्यात येणार असून, अधिक माहिती व बुकिंगसाठी कराड एसटी बस आगाराशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन आगार व्यवस्थापनाने केले आहे.

महिलांना ५०% सवलत

​एसटी महामंडळाच्या ‘महिला सन्मान योजने’अंर्गत महिला प्रवाशांसाठी प्रवास तिकिटात ५० टक्के थेट सवलत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महिला भाविक आणि बचत गटांमध्ये या धार्मिक सहलींविषयी कमालीचा उत्साह दिसून येत असून, महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग होण्याची शक्यता आहे.

धार्मिक सहलींचे आकर्षक नियोजन

  • ​२ दिवस : कराड- पंढरपूर-तुळजापूर- अक्कलकोट आणि परतीचा प्रवास.
  • ३ दिवस : कराड- पंढरपूर- तुळजापूर -अक्कलकोट- गाणगापूर यात्रा.
  • ३ दिवस : कराड ते साडेतीन शक्तीपीठ दर्शन आणि परतीचा प्रवास.
  • २ दिवस : श्री अष्टविनायक दर्शन सहल.

​एक दिवसीय विशेष टूर

  • ११ मारुती दर्शन : समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुतींचे एकाच दिवसात दर्शन.
  • वाई-महाबळेश्वर : निसर्गरम्य पर्यटन व देवदर्शन यात्रा (एक दिवस).
  • कोकण दर्शन : कराड ते मार्लेश्वर-नातेजी-गणपतीपुळे समुद्रकिनारा दर्शन (एक दिवस).