सोलापूर, पुणे व पिंपरी चिंचवडसह राज्यातील पाच महापालिकांच्या सांडपाण्यावर सुवेज प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून ते पाणी परिसरातील उद्योग प्रकल्प व एमआयडीसी भागाला येत्या दोन वर्षांत उपलब्ध केले जाणार आहे. त्यातून नद्यांमध्ये होणारे जलप्रदूषण रोखता येऊ शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सोलापूर शहरासाठी एनटीपीसी प्रकल्पाच्या उजनी धरण थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करून त्याऐवजी सोलापूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी घेण्यास एनटीपीसीने तत्त्वत मान्यता दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या सुपुत्राच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी फडणवीस हे आले होते. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर शहराच्या पाणी प्रश्नावर एनटीपीसीच्या संचालकांशी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरिन्सगद्वारे चर्चा केली. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे उपस्थित होते.
सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहरासाठी सध्या दररोज उजनी धरण ते सोलापूर थेट जलवाहिनी योजनेद्वारे ७५ एमएलडी तर भीमा-टाकळी योजनेतून दररोज ६० एमएलडी याप्रमाणे १३५ एमएलडी पाणी उचलले जाते. परंतु शहराला गेल्या अनेक दिवसांपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. भीमा-टाकळी पाणी योजनेत प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त पटींनी पाणी घ्यावे लागते. टाकळी बंधाऱ्यात साधारणत: दर दोनतीन महिन्यांनी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडावे लागते. शहराला वर्षांत दोन टीएमसी पाणी गरजेचे असताना प्रत्यक्षात नदीवाटे तब्बल २२ टीएमसी इतके प्रचंड पाणी घेतले जाते. या अव्यवहार्य बाबीचा विचार करतानाच दुसरीकडे उजनी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतोच, असे नाही. त्यामुळे शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी नदीवाटे पाणी उचलण्याऐवजी पर्यायी जलवाहिनी योजना सुरू होणे ही काळाची गरज बनली आहे.
या पाश्र्वभूमीवर सोलापूरनजीक आहेरवाडी (द. सोलापूर) येथे एनटीपीसीने हाती घेतलेल्या औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी उजनी धरणातून थेट जलवाहिनीतून (११५ किलोमीटर अंतर) दोन टीएमसी पाणी उचलण्याची योजना आखण्यात आली आहे. ही योजना येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. सोलापूरसाठी एनटीपीसी जलवाहिनी योजनेचे ७० एमएलडी पाणी घेऊन त्याऐवजी सोलापुरात १२८ एमएलडीपर्यंत तयार सांडपाण्यावर सुवेज प्रकल्पात प्रक्रिया करून ते पाणी ऊर्जा निर्मितीसाठी एनटीपीसीला देण्याचा महापालिका तथा शासनाचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मुंढे हे सतत पाठपुरावा करीत आहेत.
या संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापुरात एनटीपीसीच्या नवी दिल्लीतील संचालकाशी व्हिडिओ कॉन्फरिन्सगच्या माध्यमातून चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एनटीपीसीचे पाणी सोलापूर महापालिकेला देण्यास आणि महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले वापरण्यायोग्य पाणी घेण्यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. सोलापूर पालिकेकडून स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून नियमितपणे एनटीपीसी प्रकल्पाला सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी द्यावे, अशी रास्त अट एनटीपीसीने घातली आहे. याबाबत लवकरच करार केला जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सुवेज प्रकल्पासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध केला असून याशिवाय आवश्यक कर्ज उभारणीसाठी शासन मदत करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सोलापूर पालिकेप्रमाणेच पुणे, पिंपरी-चिंचवड आदी पाच महापालिकांना सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर येत्या दोन वर्षांत परिसरातील उद्योग प्रकल्पांसह एमआयडीसीसाठी करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले असून त्यामुळे नद्यांमध्ये होणारे प्रदूषण रोखून पर्यावरण राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.