इस्लामपूरमध्ये गेली चार दशके वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर दांपत्याचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या खुनामागे नेमके कारण काय हे अज्ञात असल्याने अवघ्या इस्लामपूर शहराला हादरा बसला आहे. राहत्या घरातच पती-पत्नीची हत्या करण्यात आल्याने तपास यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे.
इस्लामपूरच्या जावडेकर चौकात धरित्री नावाचे इस्पितळ असून या इस्पितळाच्या दुसऱ्या मजल्यावर राहत असलेले डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (वय ६२) व त्यांच्या पत्नी अरूणा (वय ५८) या दोघांचा राहत्या घरी धारदार शत्राने वार करून खून करण्यात आला. गेली ४० वष्रे हे दांपत्य शहरवासीयांची वैद्यकीय सेवा करीत होते. त्यांचा मुलगा बेळगाव येथे डॉक्टर असून घरी दोघेच वास्तव्यास आहेत.
हल्लेखोरांनी श्रीमती कुलकर्णी यांची हत्या स्वयंपाकखोलीत, तर डॉ. कुलकर्णी यांची हत्या शयनकक्षात केली आहे. घरातील अन्य कोणत्याही चिजवस्तूंना हात लावण्यात आलेला नाही. यामुळे या हत्येमागील नेमके कारण काय असावे, असा प्रश्न सामान्यांबरोबरच पोलिसांना पडला आहे. हल्लेखोरांचा शोध लावण्यासाठी श्वान पथक मागविण्यात आले मात्र या पथकाला फारसा माग काढता आला नाही.
दोघेही पती-पत्नी शनिवारची सुट्टी असल्यामुळे तळमजल्यावर असलेल्या इस्पितळाकडे फिरकले नाहीत. यामुळे रविवारी सकाळी कामावर आलेल्या आरोग्य सेविकेने दूरध्वनीवर संपर्क साधला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे तिने नजीक असलेल्या मेडिकल दुकानदार व डॉ. आफळे यांना पाचारण केले. हाका मारूनही साद मिळत नसल्याचे पाहून प्रवेशाचा दरवाजा जोराने ढकलून उघडण्यात आला असता दोघांचाही खून झाल्याची घटना समोर आली.
अगोदर लाल चौकात वास्तव्यास असलेल्या डॉ. कुलकर्णी यांनी आचार्य जावडेकर चौकात नवीन इमारत बांधून रुग्णालयासह स्थलांतर केले. शहरात एक मनमिळावू डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या खुनाचा छडा लावणे हे पोलिसांना एक आव्हान असून या खुनामागील कारणांचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाचे वेगवेगळ्या ठिकाणचे ठसे घेतले आहेत.