सांगली : बारामतीतील विमानदुर्घटनेनंतर देशभरात अनोंदणीकृत विमान चालक प्रशिक्षण केंद्रे किती आहेत याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती केंद्रिय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी सांगलीत दिली.

अंबाबाई तालीम संस्थेच्या एसबीजीआयच्या सौहार्द स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आणि ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार वितरण केंद्रिय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रारंभी राज्य मराठी पत्रकार संघटनेचे संघटक व संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी प्रास्ताविक तर सिध्दार्थ भोकरे यांनी स्वागत केले. जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी पुरस्कार देण्यामागील उद्देश कथन केला. या प्रसंगी महापौर धीरज सुर्यवंशी, मंदार फणसे, गुरूमित सिंग उर्फ शेरा, सुहास खामकर, डॉ. विनोद परमशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री मोहोळ म्हणाले, बारामतीत विमान अपघाताची घटना दुर्दैवी आहे.या अपघाताच्या चौकशीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. यामुळे दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये किती जण होते हे चौकशी अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. बारामती विमानतळ हे पायलट प्रशिक्षण केंद्र होते. याची नोंद केंद्रिय विमानतळ वाहतूक मंत्रालयाकडे नोंदणी झालेली नव्हती.

मात्र, या पुर्वीही बर्‍याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ नेते शरद पवार यांनी या ठिकाणी विमानाने प्रवास केला आहे. देशात अशी किती अनोंदणीकृत विमान चालक प्रशिक्षण केंद्रे आहेत, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही चौकशी डीजीसीए करत आहे. या अनोंदणीकृत प्रशिक्षण केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते उपाय योजले जातील असेही त्यांनी सांगितले.

दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स तपास यंत्रणेच्या हाती आहे. त्यातील माहिती संकलित केली जात असून पूर्ण माहिती हाती आल्यानंतरच तपास यंत्रणेकडून याबाबतचा अहवाल प्राप्त होणार आहे. यामुळे सद्यस्थितीत दुर्घटनेबाबत भाष्य करणे अयोग्य आहे. बारामतीची विमान दुर्घटना दुर्दैवी असून यात महाराष्ट्राने चांगला नेता गमावला असून याचे दु:ख सर्वानाच आहे असेही मंत्री मोहोळ म्हणाले.

सांगलीजवळील कवलापूरला विमानतळ उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. सध्या विमानतळाची जागा राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे असून राज्य शासन ही जागा विमानतळ उभारणीसाठी देणार आहे. विमानतळाच्या धावपट्टीसाठी जागा अपुरी पडत असून कमी पडणारी जागाही खरेदी करून देणार असून केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने या ठिकाणी विमानतळ उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.