काँग्रेसने निव्वळ ‘व्होट बँक’मधून मुस्लीम समाजाचा वापर केला. त्यांच्या विकासाच्या दृष्टीने काहीच केले नाही. या तुलनेत सध्या भाजपच्या सत्तेत मुस्लीम सर्वाधिक सुरक्षित आहेत. मदरशांचे आधुनिकीकरण, अल्पसंख्याकांसाठी योजनांमधून मुस्लिमांच्या विकासाचे प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिद्दिकी म्हणाले, आरक्षणाचा मुद्दा काढून काँग्रेसने मुस्लीम समाजाला ‘कन्फ्युज’ केले. आमचा समाज कसा मागास राहील याची दक्षता घेतली. मात्र, समाजाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी भाजप सरकार पावले टाकत आहे. शिक्षणात आरक्षण देण्याचा सध्या विचार सुरू आहे. मदरशांच्या माध्यमातून मौलवींसह डॉक्टर, अभियंते घडावेत यासाठी मदरशांचे आधुनिकीकरण करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, विरोधकांचे काही दलाल याबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. ‘व्होट बँक’ म्हणून आमचा वापर करणाऱ्यांनी मदरसा बोर्डची स्थापना केली नाही. मदरशांना ओळख देत त्यांना आधुनिक शिक्षणाची केंद्रे बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. समाजाला बळ देण्यासाठी अल्पसंख्याक विभागासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे. त्यातून शिक्षण व कौशल्य विकासाच्या योजना राबवण्यात येत आहेत. महासंपर्क अभियानाद्वारे पक्षाचे सदस्य व कार्यकत्रे वाढवून सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नेल्या जातील. पत्रकार परिषदेचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे नजीरअहमद देसाई, शेख अब्दुल करीम, ताहीर आशी आदी उपस्थित होते.