सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) गावाचे ‘सावित्रीनगर’ असे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला विशेष ग्रामसभेत बहुमताने विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नामांतराच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात गावाचे नाव बदलण्याची मागणी निवेदनाद्वारे मांडण्यात आली होती. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे आणि छगन भुजबळ यांनी ग्रामसभेचा ठराव घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने मंगळवारी नायगाव येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी उपस्थित ग्रामस्थांचे मतदान घेण्यात आले. त्यात आहे तेच नाव कायम ठेवावे, कोणताही बदल करू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेत नामांतराच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला. यामुळे हा प्रस्ताव मताधिक्याने फेटाळण्यात आला.
ग्रामसभेत काहींकडून नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात आला असला, तरी चर्चा सुरू होताच ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गावाच्या नावाशी असलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक नाते अधोरेखित करत नामांतराला तीव्र विरोध नोंदवण्यात आला. त्यामुळे नायगावच्या नामांतराचा विषय निकाली निघाला असून, पुढील हालचाली थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा किंवा तालुक्याला सावित्रीबाईंचे नाव द्या
सावित्रीबाई फुले यांचे कार्य केवळ नायगावापुरते मर्यादित नसून, व्यापक स्तरावर पसरलेले आहे. ज्याप्रमाणे अहिल्यानगर, संभाजीनगर अशी नावे इतर ठिकाणी देण्यात आली, त्याप्रमाणे सातारा जिल्ह्याला किंवा किमान खंडाळा तालुक्याला सावित्रीबाईंचे नाव द्यावे, अशा भावना काही उपस्थितांनी ग्रामसभेत व्यक्त केल्या.
नायगावचे नाव बदलून सावित्रीनगर करावे अशी ग्रामस्थांची मागणी नव्हती. ती बाहेरगावच्या संस्थेची मागणी होती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी या संस्थेने तसे पत्र दिले होते. त्यावर छगन भुजबळ यांनी जर ही ग्रामस्थांची मागणी नसेल, तर विचार करण्यात अर्थ नाही आणि जर गावाने मागणी केली असेल, तर आपण राज्य शासनाकडे तशी विनंती करू शकतो, असे सांगितले होते. मात्र तरीही हा ठराव ग्रामस्थांसमोर आल्यानंतर ग्रामसभेने एकमताने तो फेटाळला आहे. सावित्रीबाई फुले या जन्मगावाशी एकरूप झालेल्या होत्या. त्यांच्या साहित्यामध्ये आणि कवितेमध्येही ‘नायगाव’चा उल्लेख आहे. त्यामुळे या गावाला नायगाव असेच नाव असावे, सावित्रीनगर या नावाचा प्रस्ताव ग्रामसभेने बहुमताने फेटाळला आहे. – राजेंद्र नेवसे,माजी सरपंच, नायगाव
