नांदेड : नांदेड शहरात शनिवारी दुपारी दोन खुनाच्या घटना घडलेल्या असतानाच रात्री ८ वाजेच्या दरम्यान एका तरुणाने जन्मदात्या आईची हत्या करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना तरोडा (खु.) भागातील राहुल कॉलनी येथे घडली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शहरातील तरोडा (खु.) भागातील राहुल कॉलनी येथे चौथरे कुटुंबीय वास्तव्यास आहे. घटनेच्या वेळी प्रतिक बालाजी चौथरे (वय २६) व त्याची आई भारती बालाजी चौथरे (वय ५०) हे दोघे त्यांच्या घरी होते. प्रतिकने शनिवारी रात्री त्याची आई भारती चौथरे यांच्यावर घरात असलेल्या लोखंडी रॉड व क्रिकेटच्या बॅटने हल्ला चढवला. या हल्ल्यात भारती ह्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याचे प्रतिकच्या लक्षात आल्यानंतर त्याने घरातील बाथरुममध्ये जाऊन हुकाला साडी बांधून तेथे गळफास घेत आत्महत्या केली.

ही घटना शेजारील व्यक्तीला समजल्यानंतर त्याने घराच्या खिडकीची काच फोडून आत पाहिले असता भारती चौथरे ह्या जखमी अवस्थेत दिसल्या व मुलगा प्रतिक याने गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रतिकचे वडील बालाजी चौथरे हे भारतीय सैन्य दलात सीआरपीएफमध्ये कार्यरत आहेत, तर त्याची बहीण प्राची ही शिक्षणासाठी पुण्यात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. प्रतिकने हे पाऊल का उचलले, हे मात्र समजू शकले नाही.