नांदेड: शहरालगतच्या वाडी (बु.) येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख लोकप्रतिनिधींना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या रुग्णालयास सहकारमहर्षी श्यामराव कदम यांचे नाव देण्याची सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विमानतळावर भेट घेत निवेदनाद्वारे करण्यात आली.

वरील रुग्णालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर स्थानिक पातळीवर वरील मागणीने गेल्या आठवड्यात उचल खाल्ल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून या रुग्णालयासाठी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आले. तथापि याच पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी श्यामराव कदम यांचे नाव उचलून धरत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना स्वतंत्र निवेदन सादर केले. नंतर उपमुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळातही आष्टीकर सहभागी होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी नांदेडमध्ये येण्यास सुमारे दोन तास विलंब झाल्यामुळे वरील रुग्णालयाचे उद्घाटन व इतर कार्यक्रम घाईघाईने पार पाडले गेले. मुख्य सोहळ्यात भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांना भाषणाचा मान मिळाला; पण वरील रुग्णालयास पद्मश्री श्यामराव कदम यांचे नाव देण्याच्या मागणीचा त्यांनी आपल्या भाषणात कुठेही उल्लेख केला नाही. त्याबद्दल इतर लोकप्रतिनिधींनी तर आश्चर्य व्यक्त केले.

वरील मागणीचा पुरस्कार करणारे आमदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच खा.नागेश पाटील आष्टीकर यांना भाषणाची संधी मिळाली नाही, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आ.बालाजी कल्याणकर यांनीही वरील मागणीकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले नाही. या पार्श्वभूमीवर नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर आगमन होताच आष्टीकर-चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने शिंदे यांना निवेदन सादर केले.

नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आणि गेल्या शतकातील ज्येष्ठ नेते श्यामरावजी कदम यांनी सहकार, सामाजिक व शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्याच गावाजवळ नवे रुग्णालय स्थापन झाले आहे. त्यांची स्मृती जपण्यासाठी या रुग्णालयास श्यामराव कदम यांचे नाव दिल्यास शासनाकडून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होईल, अशी भावना या निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये माजी आमदार मोहन हंबर्डे, बाजार समितीचे संचालक भगवानराव आलेगावकर, सुभाष कदम, शंकरअण्णा धोंडगे आदींचा समावेश होता. खा.चव्हाण समर्थक किशोर स्वामी विमानतळावर हजर होते; पण ते या शिष्टमंडळापासून अंतर ठेवून राहिल्याचे दिसून आले.