कोल्हापूर : ज्ञानोबा-तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या अखंड जयघोषात कोल्हापूर शहर शनिवारी भक्तिरसाने न्हाऊन निघाले. वारकरी संप्रदायाची समता, सेवा आणि भक्तीची परंपरा जपत यंदाही नंदवाळ आषाढी वारी दिंडी उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ व जय शिवराय तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल मंदिरात आरतीने दिंडीचा शुभारंभ मिरजकर टिकटी येथील श्री विठ्ठल मंदिरात पहाटे भाविकांच्या उपस्थितीत सामुदायिक आरतीने दिंडीला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची आरती झाल्यानंतर चांदीचा पालखी रथ, भगव्या पताका, टाळ-मृदंग, वीणा आणि हरिनामाचा अखंड घोष करत दिंडी नंदवाळच्या दिशेने रवाना झाली.
अश्व, मेंढ्यांचे रिंगण
प्रथमच संत बाळूमामांच्या बकऱ्यांचे रिंगण आयोजित करण्यात आले होते. श्रद्धा, ग्रामीण संस्कृती आणि लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या अनोख्या सोहळ्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली. उत्साही वातावरणात माऊलीच्या अश्वाचे उभे रिंगण पार पडले. अश्वाच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात टाळ, मृदंग आणि अभंगांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या बाल दिंड्यांनी वारकरी संस्कारांचा सुंदर आविष्कार सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
उपवास साहित्याचे वाटप
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा या भावनेतून अनेक सामाजिक, धार्मिक व सेवाभावी संस्थांनी दिंडी मार्गावर केळी, राजगिऱ्याचे लाडू, खिचडी, साबुदाणा चिवडा, चहा व पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप केले. भक्तीबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत युवकांनी हातात ड्रम घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला. पालखीच्या मागे कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची वाहने आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. जाती-पातीचे भेद विसरून माणुसकी हाच खरा धर्म हा संदेश देणारी कोल्हापूरची ही नंदवाळ आषाढी वारी दिंडी यंदाही भक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा एक प्रेरणादायी उत्सव ठरली आहे.
आमदार नरकेकडून दर्शन
आषाढी एकादशी निमित्त करवीर मतदारसंघातील “प्रति पंढरपूर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नंदवाळ येथे आमदार चंद्रदीप नरके यांनी वारकरी बांधवांसोबत नंदवाळ फाट्यापासून मंदिरापर्यंत पायी वारी करत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. विठ्ठल भक्तीचा संदेश समाजात समता, सेवा आणि मानवतेची भावना दृढ करणारा आहे. विठुरायाच्या कृपेने सर्व जनतेला उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना.
शेट्टीची सद्बुद्धी दिंडी
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री यांना सद्बुद्धी मिळावी, या मागणीसाठी आज नंदवाळ येथे शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने ‘सद्बुद्धी दिंडी’ काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल चरणी साकडे घालण्यात आले. या दिंडीत कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. महामार्ग रद्द करण्याची मागणी करत आंदोलकांनी विठ्ठलाकडे प्रार्थना केली. नंदवाळ फाटा ते विठ्ठल मंदिरापर्यंत सर्व शेतकरी सरकारच्या विरोधात आक्रमकपणे घोषणा देत विठ्ठल मंदिरात दाखल झाले. शिवसेना ठाकरे गटचे विजय देवणे, स्वाभिमानीचे जिल्हा प्रमुख अजित पोवार उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शक्तीपीठ महामार्गाविरोधातील भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडण्यात आली.
