सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात कोणताही डामडौल, जाहीर सभा, जल्लोष टाळून केवळ मतदारांची घरोघरी जाउन भेट घेउन प्रचार करण्याच्या सूचना प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मूक प्रचारावर पक्षाने भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणत्याही नेत्यांच्या सभा, भाषणे होणार नाहीत, तसेच विजय संपादन केल्यानंतर मिरवणुका काढल्या जाणार नाहीत.
जिल्हा परिषदेच्या ६१ जागासाठी २११ तर पंचायत समितीच्या १२२ जागासाठी ३४० असे एकूण ५५१ उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावत आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २७ जानेवारी रोजी समाप्त झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. बुधवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार असतानाच अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. सर्वच पक्षातील प्रमुख नेते, कार्यकर्ते यांना हा जबर धक्का होता.याचा परिणाम होउन प्रचारही थांबला होता.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी गेले दोन दिवस थबकली होती. आज धिम्या गतीने प्रचाराला सुरूवात झाली आहे. मतदानही दोन दिवस पुढे गेल्याने प्रचारास दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने प्रचार सभा रद्द केल्या आहेत. तसेच उमेदवारांना मतदारांच्या घरोघरी जाउन प्रचार पत्रके वाटण्याचे आणि मतदानाचे आवाहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची विजय मिरवणूक काढली जाणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पक्षाने हा अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय घेतला आहे. आता नेत्यांच्या मोठ्या सभांशिवाय उमेदवारांना घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधावा लागणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय गणिते तालुका स्तरावरील राजकीय स्थितीनुसार मांडणी करण्यात आल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या भाजप ५०, शिवसेना शिंदे गट ३२, काँग्रेस २५, राष्ट्रवादी शरद पवार गट २४ राष्ट्रवादी अजित पवार गट ३१ जागा लढवत आहे. पलूस, कडेगाव तालुक्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे. तर मिरज तालुक्यात काही ठिकाणी काँग्रेस, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी यांची भाजपशी लढत होत आहे. जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस संयुक्तपणे भाजपशी लढत आहे.कवठेमहांकाळ व तासगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत होत आहे. तर खानापूर व आटपाडीमध्ये महायुती अंतर्गत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात लढत होत आहे. शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी विरूध्द भाजप अशी लढत होत आहे तर वाळव्यात महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. महायुतीतील जनसुराज्य शक्ती पक्षानेही या निवडणुकीत सहा जिल्हा परिषद आणि नउ पंचायत समितीच्या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यावेळी कोणत्याही स्थितीत पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त करून प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी प्रस्थापितांना असलेला विरोध ओळखूनच जनसुराज्यने नव्या विचारांचे उमेदवार दिले असल्याचे सांगितले.
जनसुराज्य शक्ती पक्षाने मिरज, कवठेमहांकाळ, जत व शिराळा तालुक्यात तरूण उमेदवार मैदानात उतरवले आहेत. महायुतीत सहभागी असूनही मिरज तालुक्यात भाजप विरूध्द जनसुराज्य शक्ती असा सामना लक्ष्यवेधी ठरत आहे. तर कवठेमहांकाळ तालुक्यात जनसुराज्य व अजितराव घोरपडे यांच्या गटासाठी भाजपने जागा सोडल्या आहेत.

