सोलापूर । काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी महिला नेत्यांविषयी केलेल्या कथित वक्तव्याचे तीव्र पडसाद सोलापुरात उमटले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या प्रतिमेला बांगड्यांच हार घालू करीत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्ते संतप्त झाले. माजी नगरसेवक तैफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. “हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील सर्वच महिलांचा अनादर केली असल्याने त्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना श्री. शेख म्हणाले, महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करणारे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. राजकीय जीवनात अशा प्रकारची खालच्या पातळीवरील भाषा खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला. उपमुख्यमंत्री पवारवहिनी यांच्या बद्दल अपशब्द बोलणार्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी त्यांच्या पाया पडावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकार्यांनी व्यक्त केली. सपकळांचे बोलणं चुकीचे असल्यामुळेच त्यांच्या फोटोला आम्ही बांगड्यांचा हार घातला आहे, यापुढे त्यांनी आमच्या नेत्यांबाबत सावध वक्तव्य करावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला पदाधिकार्यांनी दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तोफिक शेख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष सुवर्णा झाडे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश पवार, सौदागर बाबर, जितेंद्र शिलवंत, रसैफुभाई मनियार, अर्फाद सय्यद, जुनेद दर्जी, माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप ननवरे आणि उत्तर सोलापूर तालुका युवक अध्यक्ष नंदकुमार गरड यांच्यासह प्रवीण चाफा करंडे, बशीर शेख, आसिफ राजे, आखिल नाईकवाडी, बुडन नदाफ, हेमंत चौधरी, बंडू मस्के व सुनील चव्हाण यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेस भवनासमोर झालेल्या या आक्रमक आंदोलनामुळे सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सोलापूरात मागील चार दिवसांमधील हे तिसरे आंदोलन
सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अश्लिल शब्दात टिका केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन केले होते. खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करीत निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. तर, सोमवारी शिवेसना (उबाठा) गटाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी चार हुतात्मा पुतळा चौक येथे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून भाजपच्या विरोधात निदर्शनं केली होती. तर, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केले आहे.
