सांगली : एनसीआरटीच्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणारा नकाशा वगळण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सांगलीत मराठा साम्राज्य सन्मान मोर्चा काढण्यात आला.
एनसीआरटीच्या आठवीसाठी असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात येत असून याबद्दल महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य हे मराठा साम्राज्य होते. मात्र, काही मंडळींच्या आग्रहामुळे मराठा साम्राज्याचा इतिहास बदलण्याचे कृत्य एनसीआरटी करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
युवा शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांच्या पुढाकाराने मराठा साम्राज्य सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये सातारा राजघराण्यातील राजमाता कल्पनाराजे भोसले, सांगलीचे युवराज आदित्यराज पटवर्धन, पानिपतमधून रोडमराठा रामनारायण, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे असर्लेल्या प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते यांच्यासह स्वराज्यासाठी बलिदान देणार्या मावळ्यांचे वंशज सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले, गेल्या आठ-दहा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, अशी वक्तव्ये करणार्या व्यक्तींचा सरकार सन्मान करत असल्याचे दृष्य पाहण्यास मिळत आहे.
ज्या राज्यपालांनी बेताल वक्तव्ये केली अशांना पद्मभूषण दिले जाते. तर काही आमदार जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्ये करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. एखादा बाबा येतो आणि छत्रपतींनी राजपाट समर्थांना देउ केल्याचे वक्तव्य वरिष्ठांच्या साक्षीने करतो हे चुकीचे आहे. या घटनांचा निषेध व्हायलाच हवा. चुकीचा इतिहास मांडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे रोखण्याची गरज आहे.
आ. विश्वजित कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास बदलण्याचे पाप काही मंडळी करत आहेत. काही लोकांना इतिहास बघवत नाही. म्हणून चित्रपटाच्या माध्यमातून नवा इतिहास सांगण्याचा प्रयत्न होत आहे. जाणीवपूर्वक होत असलेले हे प्रयत्न इतिहासाला गालबोट लावणारे आहे.
यावेळी बोलताना राजमाता श्रीमती भोसले म्हणाल्या, संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचे प्रकार सुरू आहेत. मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास पुसण्यासाठी हे प्रयत्न सुरू असून याला महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. जर एनसीआरटीने पुस्तकातून नकाशा काढला तर राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी मराठा साम्राज्य मोर्चाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर माने, प्रा. पद्माकर जगदाळे, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
