कोल्हापूर : वैद्यकीय प्रवेशाचे अस्तित्व निश्चित करणाऱ्या, अत्यंत महत्त्वाच्या ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतला आहे. ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याची घोषणा आज करण्यात आली आहे. तथापि, या परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत कोल्हापूर जिल्ह्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी, पालका ंमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
याबाबत इचलकरंजी शिकणारा आदित्य सावंत या विद्यार्थ्याने सांगितले की, आधी दिलेला पेपर उत्तम गेला होता. पुढे येणारा पेपर कसा असणार याची चिंता लागली आहे. चांगले गुण मिळवण्याची अपेक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने पेपर देणे अडचणीचे असणार आहे. कमी गुण मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक गुण मिळवण्याची संधी मिळणार आहे. नव्याने परीक्षा घेताना अधिक चांगल्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणेचा अवलंब करण्याची गरज त्याने व्यक्त केली.
पालक तणावात
वाई येथील मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सहाय्यक संपादक संतोषकुमार मिठारी यांची कन्या कोल्हापुरात नीटची तयारी करीत आहे. याबाबत मिठारी यांनी सांगितले की, नीट परीक्षेचा गोंधळ हा विद्यार्थी, पालकांच्या भावनेशी खेळ करणारा आहे. लाखो रुपयांची फी भरून विद्यार्थी मोठ्या तयारीने परीक्षेला सामोरे जातात. परंतु सहजासहजी पेपर अनेकदा कसा फुटतो हेच कळत नाही. आता यात सहभागी असलेल्यांना अशी शिक्षा करावी की असले धाडस पुन्हा कोणी करू धजणार नाही.
या प्रकाराने विद्यार्थ्यांना आजचे सामाजिक परिस्थिती कशी समजून सांगायची हा पालकांसमोर प्रश्न पडला आहे. शिराळा तालुक्यातील पालक हनुमंत शिंदे यांनी नीट परीक्षा बाबतचा प्रकार पाहता शासन, प्रशासनाला विद्यार्थी पालक यांच्या हिताचे काही देणे घेणे की आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी चिंताजनक परिस्थिती असल्याची चिंता व्यक्त केली. गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांनी केलेली तयारी पाण्यात गेली आहे. पुन्हा त्यांना अभ्यासाला लागा असे सांगणे अवघड जात आहे.
संयमाची गरज
वैद्यकीय शिक्षणासाठीचे सल्लागार अशोक शेट्टी यांनी याबाबत संयमाची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा जिद्दीने सराव करून परीक्षेला सामोरे जायची मानसिकता करावी. पालकांनी त्यांना सांभाळून घेऊन मार्गदर्शन करावे. नव्याने येणारा पेपर योग्य सुरक्षा प्रणालीतून येण्याची दक्षता यंत्रणेने घेण्याची अत्यंत गरज आहे.
विद्यार्थी संघटना संतप्त
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोल्हापूर विभाग संघटन मंत्री अजय मोहिते यांनी केली आहे. तर, मनसेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख विनायक मुसळे यांनी शासनाने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ चालवलेला आहे. विद्यार्थी, पालक अवघड परीक्षेच्या तणावातून बाहेर आले होते. त्यांना पुन्हा या दिव्याला सामोरे जावे लागणार आहे. अशा स्थितीत या यंत्रणेत दोषींवर दोष कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.
संस्थाचालक चिंतेत
नीट परीक्षा पुढे गेली आहे. यामुळे संस्थाचालकही चिंतेत सापडले आहेत. कोरोची (तालुका हातकणंगले ) येथील भैरवनाथ मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले की, नीट सारख्या अवघड परीक्षेची तयारी गेली वर्षभर विद्यार्थी अत्यंत कसून करत होते. परीक्षा पेपर दिल्यानंतर विद्यार्थी, पालक तणावातून बाहेर आले होते. आता पुन्हा त्यांना या संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना पुरेसा सराव करता यावा यासाठी किमान महिन्याभराचा अवधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली.
