vishalgad : कोल्हापूर : इतिहासात विविध घडामोडींनी गाजलेला विशाळगड आता एका वनस्पती शोधाच्या नवलाईने देखील ओळखला जाणार आहे. कंदीलपुष्प वनस्पतीच्या कुलातील एका नव्या प्रजातीचे येथे प्रथमच दर्शन घडले आहे. कोल्हापुरातील वनस्पती अभ्यासकांना एका गडावर या प्रजातीचा शोध लागल्यामुळे तिचे नामकरण 'सेरोपेजिया शिवरायीना' असे करत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे. येथील न्यू कॉलेजचे अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. निलेश पवार तसेच चांदवड नाशिक येथील डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठामधील प्रा. डॉ. एस. आर. यादव या अभ्यासकांच्या गटाने या वनस्पतीवर संशोधन करत तिच्या शोधावर शिक्कामोर्तब केले आहे. या शोध मोहिमेवर लिहिलेला निबंध न्यूझीलंडमध्ये प्रकाशित होणाऱ्या 'फायटोटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे. हेही वाचा.विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे मदत करणार; निवडणुकीची समीकरणे बदलणार अक्षय जंगम व डॉ. निलेश पवार गेली सहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. हा अभ्यास सुरू असताना ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील ही वनस्पती पहिल्यांदा आढळली. या कुलातील अन्य प्रजांतीपेक्षा ही वेगळी वाटल्याने त्यांनी तिचा अभ्यास सुरू केला. यासाठी त्यांनी भारतामधील कंदीलपुष्प वर्गातील वनस्पतींचे तज्ञ डॉ. शरद कांबळे यांच्याशी संपर्क साधला. सखोल अभ्यासानंतर त्यांनी देखील ही नवीन प्रजाती असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर, कंदीलपुष्प (सेरोपेजिया) वर्गाला भारतभर एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे आणि आजवर या वर्गातील ६ नवीन प्रजाती शोधून काढलेले शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव यांनी केलेल्या अंतिम निरीक्षणानंतर ही वनस्पती नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते याची खात्री झाली. यानंतर या अभ्यास गटाने या संबंधीचा शोधनिबंध आतंरराष्ट्रीय नियतकालिकात पाठविला. तिथे त्यांच्या या शोधकार्यास मान्यता मिळत हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आणि कंदीलपुष्प कुलातील या नव्या प्रजातीच्या शोधावर शिक्कामोर्तब झाले. हेही वाचा.कुरुंदवाड मुख्याधिकाऱ्यांविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पाठवले सक्तीच्या रजेवर ही नवीन प्रजातीचा आढळ सध्या विशाळगडावर अत्यंत दुर्मिळ स्वरूपात आहे. या शिवाय भोवतीच्या डोंगररांगावर देखील तिचे अस्तित्व असण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. या कामासाठी कोल्हापुरातील न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. जी. पाटील यांचेही या अभ्यासकांना सहकार्य लाभले. हेही वाचा.सतेज पाटील यांचे टोल आंदोलन राजकीय फायद्यासाठी, धनंजय महाडिक यांची टीका छत्रपती शिवरायांचे नाव का? शिवकाळातील घटनांनी जिवंत बनलेल्या विशाळगडावर या नव्या प्रजातीचा शोध लागला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी तयार करवून घेतलेल्या आज्ञापत्रात देखील त्यांचा निसर्ग आणि पर्यावरणाबदलचा विचार पुढे आलेला आहे. या साऱ्यांमुळे या नव्याने शोध लागलेल्या कंदीलपुष्पास त्यांचेच नाव देण्याचे ठरले आणि 'सेरोपेजिया शिवरायीना' चा जन्म झाला !