scorecardresearch

राधानगरी, दाजीपूरमधील रात्र जंगल सफारी; काजवा महोत्सवाला पर्यावरणप्रेमींचा विरोध

कास पाठोपाठ राज्यातील पहिले अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाजीपूर अभयारण्यातील रात्र जंगल सफारी आणि काजवा महोत्सवाला वन, पर्यावरणप्रेमींकडून कडाडून विरोध होत आहे.

कोल्हापूर : कास पाठोपाठ राज्यातील पहिले अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाजीपूर अभयारण्यातील रात्र जंगल सफारी आणि काजवा महोत्सवाला वन, पर्यावरणप्रेमींकडून कडाडून विरोध होत आहे. राखीव जंगलाचे संरक्षित आणि गाभा क्षेत्र असलेल्या राधानगरी अभयारण्यामध्ये वन विभागाने सुरू केलेला सफारीला आठवडाभरातच विरोध होऊ लागला आहे. या निसर्गविरोधी या उपक्रमाविरोधात मोहीम उघडण्यात येणार असल्याचे वनस्पती अभ्यासक डॉ. मधुकर बाचुळकर यांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ामध्ये सातारा जिल्ह्यातील कास पठार येथे रात्र सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच धर्तीवर कोल्हापुरातील वन विभागानेही राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेले राधानगरी धरण आणि दाजीपूर अभयारण्य येथे जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वातानुकूलित बस आणि दोन नवीन कॅम्पर बोलेरो मोटारी खरेदी केलेल्या वाहनांचे शुक्रवारी लोकार्पण झाले. मात्र या उपक्रमास आता पर्यावरण अभ्यासकांकडून पर्यावरणप्रेमी, अभ्यासकांकडून विरोध होऊ लागला आहे.
निसर्गाचा अनमोल ठेवा
राधानगरी हे पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेच्या दक्षिण टोकाला असलेले महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे. प्रामुख्याने ते रानगवा यासाठी प्रसिद्ध आहे. १९५८ साली स्थापन करण्यात आलेल्या या अभयारण्यात ३५ प्रकारच्या वन्य प्राण्यांची व २३५ पक्षी प्रजातींची नोंद आहे. १८०० प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या तर ३०० औषधी वनस्पती आहेत. सन २०१२ मध्ये युनेस्कोने राधानगरी अभयारण्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. अशा या निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या अभयारण्यात व्यावसायिक तत्त्वावर सुरू केलेल्या जंगल सफारीला पर्यावरण अभ्यासकांकडून विरोध होत आहे.
तिसऱ्यांदा विरोध
राधानगरी अभयारण्य हे संरक्षित जंगल आहे. त्याचा गाभा भाग असलेल्या इदरगंज येथे बॉक्साइट उत्खननाचा प्रकार २५ वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हा वनस्पती अभ्यासक डॉ. बाचुळकर यांनी न्यायालयात धाव घेऊन तो बंद पाडला होता. दोन वर्षांपूर्वी तेथेच पर्यटन सुरू करण्याचा प्रयत्नही त्यांच्या विरोधामुळे बारगळला होता. आता नव्याने सुरू केलेल्या जंगल सफारीला बाचुळकर यांनी समाज माध्यमातून विरोध दर्शवला आहे. त्यांच्या भूमिकेला वन, पर्यावरण अभ्यासकांनी पाठिंबा देत हा उपक्रम बंद झाला पाहिजे, असे म्हटले आहे.
सफारी जंगलाच्या मुळावर
याबाबत डॉ. बाचुळकर यांनी विरोधाची सांगितले, ‘राधानगरी, दाजीपूर येथील केवळ पाच टक्के भाग हा संरक्षित जंगलाचा आहे. येथे रात्रीच्या वेळी निशाचर प्राण्यांचा वावर असतो. त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये जंगल पर्यटन हे जंगल, प्राणी, वनस्पती, फुले यांच्यासाठी धोकादायक आहे. सध्या काजव्यांचा गर्भकाळ हंगाम सुरू आहे. अशा वेळी तेथे रात्र जंगल सफारी सुरू करणे हे जंगल, प्राणी यांच्या मुळावर उठणारे असल्याने त्याला शासकीय पातळीवरही विरोध करणारी मोहीम सुरू केली जाणार आहे,’ असे डॉ. मधुकर बाचुळकर यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Night jungle safari radhanagari dajipur environmentalists oppose firecracker festival amy