सातारा : भारतातील शेतकरी हा आता अन्नदाता न राहता इंधन, ऊर्जा, विटुमिन आणि हवाई इंधन दाताही झाला आहे. खंडाळ्यात तयार होणाऱ्या ‘पॉसिवेल एनर्जी’ उत्पादनामुळे भारताच्या कोट्वधी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होणार असल्याचे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले.
‘सीबीजी’ (कॉम्प्रेसड बायोगॅस) उत्पादन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी संधी आहे. ‘सीबीजी’ हे केवळ एक पर्यायी इंधन नसून शेतकऱ्यांसाठी एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत आहे. आपल्या देशात कचरा ही समस्या नसून मोठी संधी आहे. प्रेसमड, नेपियर ग्रास, ॲग्री वेस्ट यांपासून सिबीजी तयार होणे, ही खूप सकारात्मक बाब आहे असेही गडकरी यांनी आज सांगितले.
साताऱ्यातील अहिरे (ता. खंडाळा) येथील ‘राज क्लिन एनर्जी’च्या नवीन ‘सीबीजी प्लांट’चे उद्घाटन आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, हर्षवर्धन पाटील, रणजित सिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
हा प्रकल्प उभारल्याबद्दल अनिल पिसे आणि संपूर्ण राज समूहाचे अभिनंदन करून गडकरी यांनी अशा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा उत्पन्नाचा स्रोत उभा राहणार आहे. येथे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असून राज्याच्या हरित विकासाला नवी दिशा देणारे मानले जात आहे. हा अत्याधुनिक ‘सीबीजी’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. नेपियर गवत, कृषी अवशेष आणि प्रेसमड यांसारख्या घटकांपासून तयार होणारा हा प्रकल्प पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यायी इंधन निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शेतकरी समृद्ध करण्यासाठी धोरणांमध्ये आवश्यक तो बदल त्या त्या वेळी न झाल्याने शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जामध्ये आणि त्याच्या दैनंदिन कामांमध्ये अडकून राहिला. पारंपरिक पिके आणि फळे यांच्याबरोबरच आपल्याला जे आपण परदेशातून आयात करतो तेथे उत्पादित करण्याला प्राधान्य शेतकऱ्यांनी द्यायला हवे. परदेशात जाणारा हा पैसा वाचवून येथील शेतकऱ्यांच्या खिशात गेला पाहिजे हा आमचा मानस आहे. त्यामुळे शेती उद्योगावर संशोधन होण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली.
देशाची लोकसंख्या आणि गाड्यांची संख्या वाढतच राहणार आहे. हे आपण रोखू शकत नाही. त्यामुळे इंधनाची गरज लागणारच आहे, तीही आपण थांबवू शकत नाही. त्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून देशांतर्गत इंधन तयार करण्याला प्राधान्य द्यायला हवे. यासाठीच केंद्र शासनाने वेगवेगळ्या इंधनाच्या उत्पादनांना प्राधान्य आणि पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे, असे गडकरी यांनी सांगितले. सध्या डांबर महाग झाले आहे. हवाई इंधनाची कमतरता असल्याने अनेक विमाने रद्द केली जात आहेत. परकीय इंधनासाठी मोठी गंगाजळी खर्ची पडत आहे. ती वाचविण्याचे आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचे काम शेतकरी आणि येथील संशोधक तरुणांचे आहे.
सध्या शासनाच्या उपक्रमामुळे अनेक दुष्काळी भागात पाणी पोहोचत आहे. जेवढे पाणी महत्त्वाचे आहे तेवढी शेती आणि शेती उत्पादनेही महत्त्वाची आहेत. त्यावेळी पाणी येणाऱ्या भागात काय उत्पादन करायचे त्याचे नियोजन करण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली. आपण आता जागतिक बाजारपेठेचा हिस्सा आहोत त्यामुळे कोणत्या उत्पादनांना आपल्याला भाव मिळेल, आपण काय आयात करतो, त्याला पर्याय आपण काय देऊ शकतो त्यातून आपले आणि देशाचे उत्पन्न वाढवू शकतो. त्यातून येथील तरुणांच्या हाताला आपण काम आणि उत्पन्न काय देऊ शकतो याचाही विचार होण्याची गरज आहे. येथील उद्योगात हायड्रोजन तयार केला जाणार आहे. हा देशातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. उसातून आपल्याला ‘बायोमास’ करता येईल आणि त्यावर संशोधन होण्याची गरज आहे.
