करोनाग्रस्त देशातून प्रवास केलेले १६ नागरिक निरीक्षणाखाली

कोल्हापूर : करोनाग्रस्त देशातून प्रवास करून आतापर्यंत १६ लोक जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. मात्र यातील किंवा जिल्ह्यातील अन्य कुणालाही करोनाचा संसर्ग झालेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

देसाई म्हणाले, की जिल्ह्य़ात आतापयर्ंत चीनमधून ५, इटलीतून ४, इराणमधून १ व सौदी अरेबिया येथून ६ आलेले आहे. पैकी ९ लोकांचा १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे करोना सदृश आजाराची लक्षणे नाहीत. उर्वरित ७ लोकांवर निरीक्षण चालू असून त्यांचा १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. त्यांनाही कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करतानाच त्यांनी खबरदारीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली.

देसाई म्हणाले, की स्थानिक स्वराज्यसंस्था व सर्व संबंधित अधिकारी यांना योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिली आहे. करोना विषाणू प्रतिबंध होण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये एकूण २० बेड, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १० बेड, इचलकरंजी आय.जी.एम. येथे ४ बेड, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात ४ बेड व खासगी रुग्णालय अ‍ॅस्टर आधार येथे १० बेड असे एकूण ४८ आयसोलेशन बेड रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आलेले आहेत.  परदेशवारीकरून आलेल्या एकदम जास्त लोकांची संख्या असल्यास त्यांना एकत्रीत ठेवून विलगीकरण करण्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.