उन्हाची तीव्रता वाढत चालली असताना आता करवीर नगरीत एक दिवसाआड ऐवजी तीन दिवसातून एकदा पाणी पुरवठा होणार आहे .  कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर योजनेच्या जलवाहिनीची गळती काढण्यासाठी व वाहिन्या बदलण्यासाठी शहरातील बहुतेक भागात सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर एक दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे पाण्यासाठी ऐन उन्हात नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे .
पंचगंगा नदीच्या पाण्याची पाणी पातळी खालावली असल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतो आहे . तथापि पुन्हा तांत्रिक  कारणाने पाणीबाणी निर्माण झाली आहे . पंचगंगा  योजनेवरील ११०० मीमी व्यासाच्या प्रिस्टेस पाईपला गळती असलेने त्याऐवजी १००० मीमी व्यासाची नवीन डी.आय.पाईप गळतीच्या ठिकाणी टाकणेत आलेली आहे. सदर पाईपलाईनवर क्रॉस कनेक्शन घेऊन नवीन टाकणेत आलेल्या पाईपलाईन कार्यान्वित करणे कामी ठिकठिकाणी क्रॉस कनेक्शन करणे आवश्यक आहे.
या कामास दिनांक २८ व २९ एप्रिल असा दोन दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे. या कालावधीमध्ये पुईखडी व कळंबा जलशुध्दीकरण केंद्राद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद असणार आहे. या  कालावधीमध्ये शहरातील ए,बी,व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व त्या अंतर्गत येणाऱ्या साळोखेनगर टाकी परिसर, आपटेनगर परिसर, महाराष्ट्र नगर, बापुराम नगर, दादु चौगुले नगर व सलग्नीत परिसर, जरगनगर, रामानंदनगर परिसर, रायगड कॉलनी, पोवार कॉलनी, ग्रामीण भाग, संभाजीनगर, एलआयसी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखे पार्क, जवाहर नगर, वाय. पी. नगर व शिवाजी पेठ (काही भाग) मंगळवार पेठ (काही भाग) तसेच ई वॉर्डातील शाहूपूरीतील (काही भाग) कावळानाका, बापट कँप, शिवाजी पार्क, न्यू शाहूपूरी सदरबाजार महाडिक वसाहत, मुक्तसनिक वसाहत परिसर टाकाळा, संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल परिसर, उद्यमनगर परिसर इत्यादी भागातील नागरिकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे होऊ शकणार नाही. तसेच दिनांक ३० एप्रिल रोजी होणार पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने  होणार आहे .
या भागातील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व खासगी टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन करणेत आले आहे.