कोल्हापूर : रक्षाबंधनाची सुट्टी आणि नारळी पौर्णिमा असा दुहेरी योग आज जुळून आल्याने नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात शुक्रवारी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला होता.
आज नारळी पौर्णिमा असल्याने शेकडो भाविकांनी सकाळपासूनच कृष्णा नदीत पवित्र स्नान केले. अनेकांनी कृष्णा स्नानानंतर थेट दत्त दर्शनाचा लाभ घेतला. रक्षाबंधनाची सुट्टी असल्याने कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कुरुंदवाडसह सीमाभागातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यामुळे दुग्धशर्करा योगाचा आनंद द्विगुणित झाला.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री दत्त देव संस्थानच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. दक्षिण आणि उत्तर घाटावर भाविकांसाठी निवारा मंडप उभारण्यात आले होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी चार स्वतंत्र दर्शन रांगा लावण्यात आल्या होत्या. तसेच पिण्याच्या पाण्याची आणि आरोग्य सुविधेची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.
पौर्णिमेनिमित्त संस्थानच्या अन्नछत्रमध्ये दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. मंदिरातील नित्यक्रमातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.
सुटी आणि सणामुळे होणारी गर्दी लक्षात घेता शिरोळ पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुरुंदवाड, कोल्हापूर, इचलकरंजी, राधानगरी, गगनबावडा, संभाजीनगर, सांगली, कागल आदी एसटी आगारांकडून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.
आजची गर्दी लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्य मार्गावर वाहनबंदी लागू केली होती, त्यामुळे भाविकांना सुलभतेने ये-जा करता आली. ग्रामपंचायतीने यात्रेचे नेटके नियोजन केल्याने नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला.
दत्त मंदिर महती
नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर हे शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले एक अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे. भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानल्या जाणाऱ्या श्री नृसिंह सरस्वती यांनी १२ वर्षे वास्तव्य केले होते. या पवित्र स्थानाला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखले जाते. मंदिरात कोणतीही मूर्ती नसून श्री नृसिंह सरस्वती यांच्या मनोहर पादुका आहेत, ज्यांची पूजा केली जाते.
