कोल्हापूर : गुरुपौर्णिमेपासून दत्त भक्तांच्या प्रतीक्षेत असलेला नृसिंहवाडी येथील या मोसमातील दुसरा “दक्षिणद्वार” सोहळा अखेर शुक्रवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.

राधानगरी आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच शिरोळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथ गतीने वाढ होत होती. मंगळवारी रात्रीच पुराचे पाणी दत्त मंदिरासमोर पोहोचले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी (बुधवारी) दक्षिणद्वार सोहळ्याचा योग येईल आणि पवित्र स्नान करता येईल, अशी तीव्र अपेक्षा दत्त भक्तांना होती. मात्र, पाणीपातळी अपेक्षेप्रमाणे न वाढल्याने बुधवार आणि गुरुवारीही भक्तांची प्रतीक्षा कायम राहिली.

​अखेर, गुरुवारी मध्यरात्रीनंतर कृष्णा नदीचे पाणी श्रींच्या चरणकमळांवर आले. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मंदिराच्या उत्तर दरवाज्यातून श्रींच्या चरणकमळावरून पाणी वाहत दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडले आणि या मोसमातील दुसऱ्या “दक्षिणद्वार” सोहळ्याची पर्वणी साधली गेली.

पहाटेची वेळ असल्याने सुरुवातीला या पवित्र स्नानासाठी मोजकेच भाविक उपस्थित होते. मात्र, समाज माध्यमाद्वारे च्या ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच, सकाळपासूनच भाविकांनी नृसिंहवाडीत गर्दी करण्यास सुरुवात केली. पाण्याचा वाढता प्रवाह व वेग लक्षात घेता दत्त देव संस्थानच्या वतीने स्नान करणाऱ्या भाविकांसाठी विविध आवश्यक सुविधा आणि सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे गुरुवारी सायंकालीन श्रींची उत्सवमूर्ती भक्त-भाविकांच्या दर्शनासाठी मंदिराच्या वरील बाजूस असलेल्या नारायण स्वामी मंदिरात स्थानांतरित करण्यात आली आहे. सध्या सर्व नित्यधार्मिक कार्यक्रम याच मंदिरात सुरू आहेत.