कोल्हापूर: मोबाईलच्या स्टेटसवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद होते. तर संबंधित तरुणांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनाने शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांना पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर शहरातील काही तरुणांनी मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा मजकूर त्यावर होता. ही माहिती समजल्यानंतर काल हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले होते. त्यानंतर शहरात काही ठिकाणी दगडफेक झाली. शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती लक्षात घेऊन जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

आणखी वाचा-“शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, निवडणूक आली की…”, भाजपा नेते निलेश राणेंचं खोचक ट्वीट व्हायरल!

कोल्हापुरात शुकशुकाट

दरम्यान आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंद ठेवण्यात यावे असे आवाहन केले होते. त्याला शहरातील व्यापारी व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील सर्व प्रकारचे व्यवहार बंद होते. कोल्हापूर सर्वत्र शांतता दिसत होती.

ठिय्या आंदोलनाला सुरुवात

दरम्यान आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांना अटक करून गंभीर गुन्हे नोंदवण्यात यावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जमावबंदी आदेश लागू असतानाही आंदोलनाला धाडसाने सुरुवात करण्यात आली आहे. हे आंदोलन कोणत्या जातीपातीचे नाही तर हिंदू धर्माच्या स्वाभिमानीसाठी सुरू केले आहे. कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रवृत्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला. भर उन्हातही हे आंदोलन सुरूच होते. यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलकांना चर्चेसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाचारण केले आहे. या बैठकीत काय होते याकडे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-कोल्हापूरात सुवर्ण जडित शिवरायांच्या प्रतिमेचा राज्याभिषेक; शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

पोलिसांचा लाठीमार

दरम्यान, हे आंदोलन सुरू असताना आंदोलक व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली सुरू झाली. तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यामुळे शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड परिसरामध्ये गर्दी पांगली.

बंदला हिंसक वळण

कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये प्रचंड मोठा जमाव जमला. या जमावाने दोषी तरुणांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान या जमावाने कोल्हापूर शहरात रॅली काढण्याचा निर्णय घेतला. त्याला पोलिसांनी आक्षेप घेतला आणि रॅलीला परवानगी दिली नाही. त्यातून वाद वाढत गेला. गंजी गल्लीत जमावाने दगडफेक केली. मटण मार्केट परिसरातही काही ठिकाणी मोडतोड झाली. अखेर पोलिसांकडून जमावावर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे महापालिका चौक परिसरामध्ये अत्यंत तणावाचे वातावरण आहे. येथे एका रिक्षाची मोडतोड करण्यात आली तर चप्पल लाईनला असलेल्या हॉलीवुड शूज या दुकानाची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. चौकात चपलांचा अक्षरश: खच पडलेला आहे. महाद्वार रोड, ताराबाई रोड, छत्रपती शिवाजी रोड, राजारामपुरी या भागातील सर्व दुकानं शंभर टक्के बंद आहेत. संपूर्ण कोल्हापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली असली, तरी शहरात तणाव आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offensive status on mobile status kolhapur band called by hindutva organizations took a violent turn mrj
First published on: 07-06-2023 at 12:50 IST