करोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने यंदा जोतिबाची चैत्र यात्रा पूर्ण क्षमतेने भरणार आहे. त्यामुळे यावर्षी सुमारे १० लाख भाविकांची उपस्थिती असेल असा अंदाज पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी वर्तवला.
दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रेचा १६ एप्रिल हा मुख्य दिवस आहे. या अनुषंगाने यात्रेचे नियोजन करण्यासाठी आज वरिष्ठ अधिकारी, सेवाभावी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांची नियोजन बैठक वाडी रत्नागिरी येथे पार पडली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले, “गेली दोन वर्ष करोना संसर्गाची छाया असल्याने जोतिबा चैत्र यात्रेला मर्यादा आल्या होत्या. यावर्षी कोल्हापूर जिल्हा करोना निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. यामुळे जोतिबा यात्रेसाठी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.”
“दरवर्षी यात्रेला सुमारे सहा ते सात लाख भाविक येत असतात. यामध्ये या वर्षी दोन लाख भाविक वाढतील असा अंदाज गृहीत धरून प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. भाविकांसाठी दीडशे बसेसची सोय केली जाते. या वर्षी अन्य जिल्ह्यातून आणखी २५ बसेस वाढविण्याचे नियोजन आहे. भाविकांना कोणतेही निर्बंध लागू नाहीत. मात्र विविध स्टॉलधारक विक्रेत्यांना प्रतिबंधक लसीचे दोन डोस बंधनकारक आहे. खाद्यपदार्थ स्टॉलधारकांना अन्न परवाना गरजेचा आहे. भाविकांना त्रास होऊ नये यासाठी गुलालाची तपासणी होऊनच विक्री केली जाईल. अन्य नियमाबाबत लवकरच पत्रक जारी करण्यात येईल,” असेही ते म्हणाले.