सातारा : नवी मुंबईच्या ‘आरंभ’ संस्थेच्या माध्यमातून वाई तालुक्यातील अनेक शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच, खेड्यापाड्यांतील विकासाला गती देण्याचे मोठे कार्य सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून वाई तालुक्यातील ओझर्डे येथील ‘माळ आळी’ आडावर (विहिरीवर) ‘आरंभ’ संस्थेच्या अध्यक्षा शोभा मूर्ती यांच्या विशेष प्रयत्नातून सोलर सुविधा यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे दरमहा येणारे मोठे वीज बिल आता वाचणार असल्याने सर्व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी ‘कविता सिप्रा मस्क प्रायव्हेट कंपनी लिमिटेड’ आणि ‘आरंभ’ संस्थेच्या शोभा मूर्ती यांनी ओझर्डे गावाला प्रत्यक्ष भेट दिली होती. भेटीदरम्यान त्यांनी गाव विकासातील विविध ‘आरंभ’ संस्थेच्या माध्यमातून उपक्रम योजना व गरजा समजून घेतल्या. ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दरमहा येणारे विजेचे बिल खूप जास्त असून, ते न परवडणारे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गावाची ही अडचण ओळखून त्यांनी तत्परता दाखवत एका महिन्याच्या आत माळ आळी येथील आडावर सोलर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते; आणि ते अत्यंत कमी कालावधीत पूर्णही करून दाखवले.
हे सोलरचे काम ‘जय हिंद सोलर’चे महेश घरटे यांनी अत्यंत कमी कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले. या कामात त्यांना मयूर डिसिल्वा आणि भरत सणस यांचे सहकार्य लाभले. तसेच आरंभसंस्थेचे समन्वयक शेखर जाधव आणि वाईचे अभियंता गणेश कोदे यांचेही विशेष सहकार्य मिळाले.
संस्थेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी या भौतिक सुविधा देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी या सुविधांचा योग्य प्रकारे वापर करून
त्यांची नियमित देखभाल करावी, असे आवाहन शोभा मूर्ती यांनी या वेळी केले. तसेच विजयसिंह पिसाळ यांचे गावाविषयी असणारे योगदान अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे कार्य यशस्वी करण्यासाठी गावातील ज्येष्ठ नेते विजयसिंह पिसाळ, विक्रमसिंह पिसाळ, अण्णासाहेब फरांदे, विश्वजित पिसाळ, अविनाश फरांदे, सरपंच शेखर फरांदे, केशव पिसाळ, एल. डी. फरांदे, विशाल फरांदे, रवींद्र कुंभार आणि सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच ग्रामसेवक संजय वर्णेकर, हणमंत कदम आणि प्रमोद सोनवणे यांनीही प्रशासकीय पातळीवर मोलाचे सहकार्य केले.
पाण्याची मोटर आता पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार असल्याने पाण्याचा प्रश्न सुटला असून, ग्रामपंचायतीला आर्थिक दिलासा मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ओझर्डे ग्रामस्थांच्या वतीने आरंभ संस्था आणि शोभा मूर्ती यांचे विशेष कौतुक करून आभार मानण्यात आले.
