सातारा : पालघर येथे एकतर्फी प्रेमातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महसूल सहायक तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली सव्वादोन महिन्यांची झुंज अखेर संपुष्टात आली. या घटनेमुळे मूळ गाव पुळकोटी (ता. माण) आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संशयित आरोपी अमोल मुळे (जि. बीड) याला तत्काळ फाशी देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
पालघरमधील या तरुणीवर १२ जून रोजी मुळे याने भरदिवसा कोयत्याने वार केले होते. ही हादरवणारी घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पालघर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीस तत्काळ अटक केली होती.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जिद्दीने अभ्यास करत तरुणी अवघ्या ७ महिन्यांपूर्वीच महसूल सहायक (लिपिक) पदावर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाली होती. तिच्या या यशामुळे तरुणीच्या कुटुंबाचा आधार वाढला होता; मात्र या हल्ल्याने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला.
पालघरमधील प्राथमिक उपचारानंतर कुटुंबीयांनी तिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. ‘लेक बरी व्हावी’ या आशेने कुटुंबाने वैद्यकीय खर्चासाठी स्वतःची जमीन विकून तब्बल ३५ लाख रुपये उभे केले. मात्र, सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
आरोपीला फाशी देण्याची मागणी
बहिणीवर हल्ला झाल्यानंतर उपचारादरम्यान आम्हाला अनंत अडचणी आल्या. आता माझी बहीण या जगात राहिली नाही. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होऊन खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि नराधम संशयिताला फाशीचीच शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे. – तरुणीचा भाऊ
