सोलापूर – पहाटेची चारची वेळ, तांबडं फुटण्यापूर्वीचा शांत, प्रसन्न आणि ब्रह्ममुहूर्ताचा अतिशय पवित्र काळ. संपूर्ण पालखी तळावर एका अलौकिक भक्तीचे वलय पसरले होते. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या काकड आरतीची लगबग सुरू झाली आणि वातावरणातील सर्व ऐहिक कोलाहल शमून केवळ भावभक्तीचा शांत निनाद उरला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील पालखी तळावर पहाटे पूजेची लगबग सुरु होती.
गुरुजींनी पूजेची शिस्तबद्ध मांडणी सुरू केली. मोठ्या पेटीतून चांदीचे नक्षीदार मखर, चौरंग आणि पूजेचे साहित्य हळुवारपणे बाहेर आले. सोहळाप्रमुख अॅड. राजेंद्र उमप यांच्यासह विविध मान्यवर आणि विश्वस्त पूजेसाठी पालखी मंडपात एकत्र आले. टाळकरी आपापल्या जागी स्थानापन्न झाले आणि क्षणात टाळांचा मधाळ किणकिणात अवकाशात विरघळू लागला. उघाळलेल्या चंदनाचा गंध आणि ताज्या फुलांच्या सुगंधाने संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला. त्यापाठोपाठ आकाशाच्या पटलावर वेदमंत्रांचे घोगरे स्वर घुमू लागले.
‘उठोनिया पहाटे, विठ्ठल पाहे उभा नीट, चरण तयाचे गोमट, अमृत वृष्टी आवलोकित…’ अभंगाच्या या ओळींनी काकडा आरतीला सुरुवात झाली. अॅड. उमाप यांनी रेशमी सोवळे नेसून पूजेचा संकल्प सोडला.
पालखीतील माऊलींच्या बालपादुका चांदीच्या भव्य ताम्हणात घेण्यात आल्या. त्यानंतर दूध, दही, पिठीसाखर, मध आणि तूप असा पंचामृताचा अभिषेक माऊलींच्या पादुकांवर करण्यात आला. कोमट पाण्याने स्नान घातल्यानंतर पादुकांना मोगऱ्याचे अत्तर आणि चंदनाचा टिळा लावण्यात आला. त्यावर तुळशीपत्रे आणि रंगीबेरंगी फुलांची मनमोहक आरास साकारली गेली.
दुधाने भरलेल्या चांदीच्या कलशातून अभिषेकच्या सहस्त्रधारांद्वारे पादुकांवर पवमान अभिषेक करण्यात आला. चांदीची नक्षीदार प्रभावळ असलेल्या सिंहासनावर पादुका पुन्हा विराजमान झाल्या. षोडशोपचार पूजेदरम्यान एकीकडे वेदोक्त परंपरेनुसार रुद्र पूजन घुमत होते, तर दुसरीकडे वारकरी संप्रदायातील पंचपदीचे भजन रंगत होते. ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्गाचा हा सुंदर संगम एकाच वेळी साधला जात होता. आरतीनंतर माऊलींना बेसन लाडू, करंजी, पंचखाद्याचे प्रकार, पेढे, दूध, फळे, आणि शेंगदाण्याच्या लाडूंसह विविध पदार्थांचा भावपूर्ण नैवेद्य दाखवण्यात आला. पहाटे शितोळे सरकारतर्फे नैवेद्य दाखविण्यात आला. त्यावेळी गीतेच्या १५ वा अध्याय म्हणण्यात आला.
प्रवासाची लगबग…
एकीकडे भक्तीचा हा सोहळा रंगत असताना, दुसऱ्या बाजूला पुढील प्रवासाची तयारी सुरू होती. तंबू उतरवणे अन् साहित्य ट्रकमध्ये भरण्याची धावपळ चालली होती. आरती संपन्न होताच, पालखी मार्गस्थ होण्यासाठी मोठा कर्णा वाजवून इशारा देण्यात आला अन् संपूर्ण तळ पुन्हा एकदा ‘माऊलीं’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
