कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील नमूद भागात रब्बी हंगाम कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम मधील तरतूदीनुसार उपसाबंदी जाहीर केली आहे.

मृग नक्षत्राच्या आगमना वेळीच हा निर्णय घेतला असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना नदीतून पाणी उपसा करणे शक्य होणार नाही.

भोगावती नदी कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील यवलूज  बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर  बंधाऱ्यापंर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ बंधाऱ्याच्या खालील बांजू कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमांपर्यंत दोन्हा तीरावर वर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात ६ ते ७ जून  या दोन दिवसांच्या कालावधीत शेतीसाठी वापरल्या जाणा-या उपसा यंत्रासाठी उपसाबंदी केली आहे.

पंचगंगा नदी कार्यवाहीचा भाग-पंचगंगा नदीवरील शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याखाली ते रुई कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तिरावरील भाग वर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तिरावरील भागात ८ ते ९ जून  या कालावधीत शेतीसाठी वापरल्या जाणा-या उपसा यंत्रासाठी उपसाबंदी केली आहे.

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करून परवाना धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणा-या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असे पत्रकात म्हटले आहे.

नदीची पार्श्वभूमी

भोगावती नदी ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे, जिच्या संयुक्त प्रवाहातून पुढे ‘पंचगंगा नदी’ बनत. ही नदी पश्चिम घाटातील फोंडाघाटाजवळ उगम पावते आणि पुढे कसारी, कुंभी, तुळशी आणि सरस्वती या नद्यांसोबत मिळून पंचगंगा नदीची निर्मिती करते. कोल्हापूरजवळील प्रयाग संगम (चिखली गाव) येथे भोगावती, कसारी, कुंभी, तुळशी आणि सरस्वती या पाच नद्यांचा संगम होतो, ज्यामुळे या नदीला ‘पंचगंगा’ नाव पडले आहे.

या नदीवर ‘राधानगरी धरण’ (लक्ष्मी तलाव) बांधण्यात आले आहे, ज्याची निर्मिती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली होती.हे धरण कोल्हापूर परिसरातील शेती आणि जलविद्युत निर्मितीचा मुख्य स्त्रोत आहे. पंचगंगा नदी ही महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगिकीकरणामुळे इतर नद्यांप्रमाणे याही नदीमध्ये प्रदूषण होत आहे.