कोल्हापुरात पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने, राधानगरी धरणाचे २ दरवाजे उघडले, नागरिकांचे स्थलांतर सुरू

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

कोल्हापुरात पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने, राधानगरी धरणाचे २ दरवाजे उघडले, नागरिकांचे स्थलांतर सुरू
कोल्हापुरात पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने

कोल्हापूर : पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर राधानगरी धरणाचे दोन दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्याचे बुधवारी जाहीर केले. कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचा एक दरवाजा पहाटे साडेपाच वाजता उघडण्यात आला. तर दुसरा सकाळी ९ वाजता उघडण्यात आला.

पंचगंगा धोका पातळीकडे

 धरणातून पाणी विसर्ग सुरू ठेवला असल्याने नदीकडच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ होऊ लागले आहे. पंचगंगा नदीची नदीने ३९ फूट ही इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या पाणी पातळी ४० फुटावर असून ती ४३ फूट या  धोका पातळीच्या दिशेने धावत आहे.

कोल्हापुरात नागरिकांचे स्थलांतर

   पावसाचा जोर पाहता धोका पातळी ओलांडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. कोल्हापूर शहरातील नदीकाठच्या भागातील लोकांचे स्थलांतर केले जात आहे. महापालिका प्रशासनाने ६० लोकांचे स्थलांतर आज सकाळी केले.

 वारणा पाटबंधारे उपविभाग यांचे कडून दिलेल्या माहितीनुसार ६८०० क्युसेक विसर्ग सुरू होता. तो आता ९४.४८ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती वारणा पाटबंधारे उपविभागातर्फे करण्यात आली आहे.आज  कासारी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर थोडा कमी झाल्याने, धरणाच्या पाणी पातळी मध्ये घट होत आहॆ. धरण परिचालन सूची प्रमाणे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून  सोडण्यात येणारया  पाण्याच्या विसर्गामध्ये सकाळी ९ वाजल्यापासून १०९० क्यूसेस वरुन ७३० क्यूसेस इतकी घट केली आहॆ . तरी नदी काठच्या गावांना व ग्रामस्थांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कोल्हापूर : नृसिंहवाडीत यावर्षीचा दुसरा दक्षिणद्वार सोहळा; स्नानाकरता भाविकांची गर्दी
फोटो गॅलरी