कोल्हापूर : पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणाचे ४ दरवाजे आज उघडण्यात आले. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्याचे बुधवारी जाहीर केले.

 कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा मध्ये वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचा एक दरवाजा पहाटे साडेपाच वाजता उघडण्यात आला. तर चौथा दुपारी ४ वाजता उघडण्यात आला.

पंचगंगा धोका पातळीकडे

 धरणातून पाणी विसर्ग सुरू ठेवला असल्याने नदीकडच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत ही वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीने ३९ फूट ही इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या पाणीपातळी ४१ फुटांवर असून ती ४३ फूट या धोकापातळीच्या दिशेने धावत आहे.

 कोल्हापुरात नागरिकांचे स्थलांतर

पावसाचा जोर पाहता धोकापातळी ओलांडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. कोल्हापूर शहरातील नदीकाठच्या भागातील लोकांचे स्थलांतर केले जात आहे. महापालिका प्रशासनाने सुतार वाडा भागातील १६ कुटुंबांतील ६० लोकांचे स्थलांतर आज सकाळी केले. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान, पूरग्रस्तांनी गळक्या भागात महापालिका प्रशासनाने ठेवल्याची तक्रार केली आहे. तर प्रशासनाने पावसाचे तुषार येत आहेत. गळती नाही. त्यांना योग्य सुविधा दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे.