सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात शनिवारी देखील ८२ हजार क्युसेक आणि वीर धरणातून नीरा नदीपात्रात ४० हजार क्युसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. या वाढत्या विसर्गामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीने इशारा पातळी गाठली आहे. नदीकाठच्या व्यास-नारायण झोपडपट्टीतील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. एनडीआफएफचे पथक आपत्तीव्यवस्थापनासाठी सज्ज आहे.
भीमा नदीच्या खोर्यात पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी दौड येथे भीमा नदीपात्रामध्ये अद्याप ९७ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून पाच दिवसांपासून मोठा विसर्ग सुरुच असून शुक्रवारपासून यंदाच्या हंगामातील सर्वांधिक ८२ हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे.
पंढरपूरात भीमा ने काढली इशारा पातळी….
उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर येथे भीमा नदीपात्रामध्ये तब्बल ४४२ मीटर पाणी पातळी आहे. उजनी धरण व्यवस्थापन विभागच्या अंदाजनुसार पंढरपूरमध्ये नदीपात्रात ४४३ मीटर पाणी पातळी दक्षतेचा इशारा व ४४५ मीटर पातळी ही धोक्याची पातळी आहे. सध्या, पाणीपाळी इशारा पातळीच्या जवळ असल्याने नदीपात्रालगतच्या व्यासनारायण झोपडपट्टीमधील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. धरणातून आणखी पाणी सोडणे सुरुच असल्याने एडीआरएफची तुकडी त्या भागामध्ये सज्ज आहे. तहसीलदार सचिन लुंगटे व नगरपालिकेचे अधिकारी व कमर्चार्यांनी स्थलांतरीत केलेल्या लोकांची पिण्याचे पाणी व इतर व्यवस्थेसाठी प्रयत्नशील आहेत.
जिल्ह्यात एकाचवेळी पूर अन् पाणीटंचाई देखील
सोलापूर शहर व जिल्ह्यात जुलै महिना संपला तरी वार्षिक सरासरी ४८१.१७ मिमीच्या तुलनेत फक्त २०५.५ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. पण, शेजारच्या जिल्ह्यात पडणार्या पावसामुळे भीमा नदीला मात्र पूर आला आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील २८ गाव व १४६ वाड्या-वस्त्यांमधील ८० हजार लोकांना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. उजनी धरणाच्या लगत असलेल्या माढा व करमा तालुक्यात प्रत्येकी चार, सांगोलामध्ये ६, दक्षिण सोलापूर २, उत्तर सोलापूर ३, मोहोळ, अक्कलकोट व बार्शीमध्ये प्रत्येक १, माळशिरसमध्ये ४ असे एकूण ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. ऐन पावसाळ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात एकीकडे पूर अन् दुसरीकडे पाणी टंचाईमुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा असा विरोधाभास देखील आहे.
