पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये परंपरेनुसार मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यात येत आहे. मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीला म्हणजे (मंगळवारी) रुक्मिणी मातेचे दर्शन व भोगी करण्यासाठी महिला भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. या दिवशी पुरुष भाविकांनी शक्यतो मुखदर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे. संक्रांतीला रुक्मिणी मातेचे दर्शन व भोगी करण्यासाठी राज्यातून महिला भाविक येतात.
मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीला म्हणजे १३ जानेवारी रोजी रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे तीन ते साडेचार या वेळेत करण्यात येणार आहे. ज्या माता व भगिनींना श्री रुक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल, त्यांनी मंदिरामध्ये पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेत करावी. त्या दिवशी पहाटे साडेपाचनंतर श्री रुक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील व सकाळी साडेसहानंतर दर्शन सुरू करण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने मंगळवारी (दि.१३) श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे साडेचार ते पावणेसहा या वेळेत होऊन, पदस्पर्श दर्शन पहाटे सहानंतर सुरू करण्यात येणार आहे.
बुधवारी (दि.१४) नेहमीच्या वेळेमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्य पूजा झाल्यानंतर श्री रुक्मिणी मातेस अलंकार परिधान करून दर्शन सुरू करण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी (दि.१५) नेहमीप्रमाणे श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा नेहमीच्या वेळेत करण्यात येणार असून, दिनांक १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त जास्तीत जास्त माता व भगिनींना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरिता पुरुष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दर्शनरांग व्यवस्थापन, कमांडोज नियुक्ती, टोकन दर्शन बुकिंग व्यवस्था बंद, चांगली स्वच्छता व्यवस्था, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या कमी करून भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदरचा उत्सव मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच सर्व सदस्य महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत असल्याचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी यावेळी सांगीतले.
