कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शाळकरी मुलाची काळजी घेण्याचे पत्र पोलिसांना पाठवून िहदू विधिज्ञ परिषदेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी अप्रत्यक्षरीत्या त्या मुलास खुनाची धमकी दिली आहे. त्यामुळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी कॉ. दिलीप पवार आणि पानसरे कुटुंबीयांनी शुक्रवारी कोल्हापूर पोलिसांकडे केली. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शाहुपुरी पोलिसांकडे देण्यात आले आहे.
२२ डिसेंबर रोजी पुनाळेकर यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि कोल्हापूर पोलीस यांना या हत्येप्रकरणातील साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलाची काळजी घेण्याबाबतचे पत्र दिले आहे. या पत्रात त्याची दैनंदिनी नमूद करण्यात आली आहे. पत्रामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणात साक्षीदार असलेले सर्वच भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. यापकीच एक असलेल्या कॉम्रेड दिलीप पवार यांनी या मुलास अप्रत्यक्षरीत्या खुनाची धमकी देणाऱ्या पुनाळेकर यांच्यावर कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन मेघा पानसरे, पवार यांनी दिले आहे. या वेळी वकील विवेक घाडगे, प्रकाश मोरे उपस्थित होते.