परभणी : नागरिकांना सुरक्षित व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यांत दोन ठिकाणी कारवाई करून सदोष असलेले बेकरी पदार्थ व खुले खाद्यतेल यांचा एकूण रुपये ३ लाख ४७ हजार ४४० किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी परभणी येथील वसमत रस्त्यावरील मे. किसान फूड्स या बेकरीची आकस्मिक तपासणी केली. या बेकरीमध्ये उत्पादित टोस्टच्या पाकीटांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ नुसार आवश्यक लेबलशिवाय विक्री व अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन केल्यामुळे चेरी टोस्ट आणि तीळ टोस्ट या अन्नपदार्थांचा एकूण रुपये २८ हजार ८० किमतीचा २८६ किलोग्रॅम वजनाचा साठा जप्त करण्यात आला.
मंगळवारी (दि. २) परभणी येथील कच्छी बाजार येथील मे. मनियार ट्रेडर्स या पेढीची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी खुल्या स्वरूपात विक्री करण्यात येणारे सोयाबीन तेल आणि पाम तेलाचा रुपये ३ लाख १९ हजार ३६० किमतीचा १ हजार ९९६ किलोग्रॅम वजनाचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही ठिकाणच्या जप्त साठ्यातून नमुने घेऊन विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई घेण्यात येणार आहे.
ही कारवाई परभणी येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) श्री. अ. ए. चौधरी आणि छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहा आयुक्त (अन्न) श्री. एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे आणि तुषार घोपे यांच्या पथकाने केली.दरम्यान,अन्न व औषध प्रशासनाच्या परभणी कार्यालयातर्फे उन्हाळी मोहिमेअंतर्गत जिल्ह्यांत इतर अन्न पदार्थांसोबतच आंब्याचे चार, बर्फाचे दोन आणि आइसक्रीम फ्रोजन डेझर्ट यांचे ४ नमुने घेण्यात येऊन विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाची भेसळखोर, नियमबाह्य अन्नपदार्थ उत्पादक व विक्रेते तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रेते यांच्या विरोधात मोहीम यापुढेही नियमित सुरूच राहणार आहे, असे सहायक आयुक्त श्री. चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
