कराड : ​पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील निवी, कसणी आणि लगतच्या विस्तीर्ण प्रदेशात वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने तयार केलेले भात आणि नाचणीच्या तरवांचे वाफे प्रत्यक्ष रोपलावणीची वेळ येण्यापूर्वीच गव्यांच्या कळपांनी फस्त केली आहेत. यामुळे ऐन हंगामात शेतात लावणी करायची तरी कशी, असे अस्मानी संकट येथील दुर्गम, डोंगरी कष्टकरी बळीराजासमोर उभे ठाकले आहे.

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेली ही गावे घनदाट जंगलाला लागून असल्याने, येथे गवे आणि रानडुकरांचा त्रास शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजला आहे. यंदा लागणीपूर्वीच रोपे फस्त झाल्याने “प्रत्यक्ष लावणीपर्यंत वाफ्यात तरू शिल्लक राहणार की नाही?” असा हताश सवाल शिवारातून विचारला जात आहे.

​हातातोंडाशी आलेला घास वन्यप्राणी हिरावून घेत असल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पिकांचे रक्षण करण्यासाठी काही जिद्दी शेतकरी रात्रीचा जागृत पहारा देत आहेत; परंतु शेतकऱ्यांचा डोळा चुकवून प्राणी चोरट्या मार्गाने शिवारात घुसून धुमाकूळ घालत असल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

सातत्याने होणाऱ्या या नुकसानीला आणि त्रासाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी शेती सोडून रोजगारासाठी थेट पुण्या, मुंबईची वाट धरली आहे. शेतकरीच गावाबाहेर गेल्यामुळे डोंगराळ भागातील पडीक जमिनींचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. जमिनी सातबाऱ्यावर स्वतःच्या नावावर असूनही पिकांचे संरक्षण होत नसल्याने, पोटापाण्यासाठी दुसऱ्या गावांत जाऊन शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे. वनविभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

(ऐन मोक्याला’तरू’ फस्त)

​निवी व कसणीसह लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी भात व नाचणीची रोपे (तरू) तयार केली होती. मात्र प्रत्यक्ष रोपलावणीपूर्वीच गव्यांच्या कळपांनी हे वाफे खाऊन टाकल्याने निवी येथील विठ्ठल आनंदा कोळेकर आणि बबन पांडुरंग साबळे आदी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

( समस्यांचाही डोंगर )

‘सह्याद्री’च्या डोंगर रांगातील या दुर्गम, डोंगरी जनतेसमोर सध्या समस्यांचाही डोंगर उभा आहे. पडीक जमिनी अन् वन्यप्राण्यांचा उपद्रव या आणि अशा अनंत अडचणींना वैतागून स्थानिक शेतकरी उपजीविकेची भ्रांत घेवून महानगरांची वाट धरत आहे. ​वन्यप्राण्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला रामराम ठोकून पुणे, मुंबई गाठली आहे. जमिनी तुकड्या- तुकड्यांत विखुरलेल्या असल्याने शासनाच्या सौर कुंपण योजनेचा लाभ घेण्यातही तांत्रिक अडचणी येत आहेत. परिणामी, शेती पडीक राहून अनेक शेतकरी मजुरीवर जगण्यास हतबल झाले आहेत.

( रात्रीचा पहारा निष्फळ ) वनविभागाने भरपाई द्यावी

​जिद्दी शेतकरी रात्री जागून शिवाराची राखण करत असले तरी गवे लपून-छपून पिकांवर धाड टाकत आहेत. त्यामुळे प्रशासनाने व वनविभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि या वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.