कराड : जिवंतपणी हालअपेष्टा सहन करणाऱ्या ग्रामीण जनतेला मृत्यूनंतरही सन्मानाचा अंत्यसंस्कार मिळणे कठीण झाले आहे. ढोरोशी (ता. पाटण) येथे प्रशासकीय दिरंगाईचा एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक साहेबराव मारुती मुळीक यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार सुरू असतानाच, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला प्रचंड पाणी आले आणि या ओढ्याला पूर येवून गावकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पेटती चिताच मृतदेहासह वाहून गेली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विसर्जन कशाचे करणार?
साहेबराव मुळीक यांच्या निधनानंतर त्यांचे नातेवाईक आल्यावर ओढ्यालगतच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू झाले. मुखाग्नी दिल्यानंतर चिता नुकतीच पेटली होती, तितक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. ओढ्याचे पाणी प्रचंड वेगाने वाढल्याने अर्धवट जळणारा मृतदेह आणि लाकडे पुरात वाहून गेली. तिसर्या दिवशी रक्षा विसर्जनाचा धार्मिक विधी असतो; मात्र जागेवर अस्थीच शिल्लक न राहिल्याने विसर्जन कशाचे करायचे, या विवंचनेत मुळीक कुटुंब अश्रू ढाळत आहे.
प्रशासनाची उदासीनता
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, ग्रामीण भागातील अपुऱ्या मूलभूत सुविधांचे वेदनादायी वास्तव आहे. ढोरोशी ग्रामपंचायतीने सुरक्षित व सुसज्ज स्मशानभूमीसाठी, तसेच जागा खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या (‘डी.पी.डी.सी.’) जनसुविधा योजनेतून वारंवार निधीची मागणी केली होती. प्रशासनाकडे अनेकदा प्रस्ताव पाठवूनही ते लालफितीत अडकले. प्रशासनाच्या याच उदासीनतेमुळे आज एका मृतदेहाला हक्काची जागा मिळाली नाही आणि त्याची विटंबना झाली.
‘जिल्हा नियोजन’कडे मागणी
ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या जागेसाठी नव्याने प्रस्ताव सादर केला आहे. आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देऊन तात्काळ निधी वर्ग करावा, अशी कळकळीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने आतातरी जागे व्हावे. मृत्यूनंतर मिळणारा सन्मान हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे. ढोरोशीसारखी हृदय पिळवटून टाकणारी घटना पुन्हा कुठेही घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून निधी मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
