कराड : पाटण शहरातून वाहणाऱ्या केरा नदीच्या पात्रात प्रचंड कचरा व मांसाहारी पदार्थांची घाण टाकली जात असल्याने नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाटण शहराची जीवन वाहिनी मानली जाणारी ही नदी सध्या अनियंत्रित कचरा विल्हेवाट आणि जैविक दूषित घटकांमुळे गंभीर संकटात सापडली आहे. नदीपात्रात मटण, चिकन व माशांचे अवशेष, हॉटेल्समधील टाकाऊ अन्न तसेच घरगुती व व्यावसायिक कचरा रात्रीच्या अंधारात पुलावरून फेकला जात आहे. या सडणाऱ्या जैविक घटकांमुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटून जलचरांना तीव्र विषबाधा झाली आहे. परिणामी लहान-मोठ्या माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होऊन नदीपात्रात मृत माशांचे खच पडल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
या दुर्गंधीमुळे नदीपात्राचे रूपांतर डम्पिंग ग्राउंडमध्ये झाले आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे अनधिकृत कचरा टाकणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. ‘स्वच्छ व सुंदर पाटण’चा दावा करणाऱ्या नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष केले आहे. वृत्तपत्रांच्या माध्यमातून वेळोवेळी इशारा देऊनही कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक पावले उचलली गेली नाहीत. स्थानिक पर्यावरण, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. प्रशासनाने आता तरी पुलावर देखरेख व्यवस्था उभारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.
कठोर कारवाई करा
पाटण नगरपंचायत प्रशासनाने तातडीने केरा नदीपात्राची संपूर्ण स्वच्छता करावी. चिकन-मटणचा कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच नदीकाठावर व पुलाजवळ तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून २४ तास देखरेख ठेवावी. मांसाहारी कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी स्वतंत्र जैविक कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारणे अत्यंत आवश्यक आहे.
आपली नदी- आपली जबाबदारी
नदी ही केवळ पाण्याचा स्त्रोत नसून परिसर, शेती, जैवविविधता व मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे. त्यामुळे स्वच्छ नदी आणि निरोगी भविष्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिक, विविध सामाजिक संघटना व पर्यावरणप्रेमींनी एकत्र येणे गरजेचे आहे. केरा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तातडीने व्यापक स्वच्छता मोहीम राबवून नदी संवर्धनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवणे ही काळाची गरज आहे.
